तर आठवडाभरात जिल्हा काेरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:19 AM2021-07-12T04:19:00+5:302021-07-12T04:19:00+5:30
गोंदिया : कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने घट होत असून मात करणाऱ्यांची संख्या दुप्पट आहे. त्यामुळेच अल्पावधीतच कोरोनाचा संसर्ग आटोक्यात ...
गोंदिया : कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने घट होत असून मात करणाऱ्यांची संख्या दुप्पट आहे. त्यामुळेच अल्पावधीतच कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. जिल्ह्यात कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २१ वर आली असून मात करणाऱ्यांची घोडदौड कायम राहिल्यास जिल्हा आठवडाभरात पूर्णपणे कोरोनामुक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रविवारी (दि.११) जिल्ह्यात ८ बाधितांनी कोरोनावर मात केली तर १ नवीन रुग्णाची भर पडली. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने १३६५ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १३१३ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ५२ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात १ नमुना निगेटिव्ह आले. कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने घट झाली असून मागील महिनाभरात रुग्ण संख्या पूर्णपणे आटोक्यात आली आहे. त्यामुळेच गोंदिया जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत २०५९५० नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १८०६५८ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यांतर्गत २१९८७८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १९८७९६ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४११६६ कोरोना बाधित आढळले असून यापैकी ४०४४४ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत २१ कोरोना ॲक़्टिव्ह रुग्ण असून १ स्वब नमुन्याचा अहवाल प्रलंबित आहे.
............
संसर्ग आटोक्यात पण दुर्लक्ष नकोच
कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरली असून जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. असे असले तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियम व उपाययोजनांकडे दुर्लक्ष न करता त्यांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.