जमिनीतील पोषक तत्त्वे झाली गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 10:02 PM2019-06-14T22:02:50+5:302019-06-14T22:03:15+5:30
आधुनिकतेच्या काळात नवीन तंत्र वापरून पिकांचे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तथापि उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होत असल्याने जमिनीतील मुख्य पोषक तत्वेच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे भविष्यात शेती बंजर होण्याची शक्यता बळावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आधुनिकतेच्या काळात नवीन तंत्र वापरून पिकांचे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तथापि उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होत असल्याने जमिनीतील मुख्य पोषक तत्वेच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे भविष्यात शेती बंजर होण्याची शक्यता बळावली आहे.
किमान १० वर्षांपूर्वी शेतकरीशेती व्यवसायाबरोबर गाय, म्हैस, बैल, शेळ््या आदी पाळीव जनावरे पाळत होते. शेतीपूरक व्यवसाय म्हणूनही त्यांचा वापर होत होता. या पाळीव जनावरांची विष्ठा शेतीसाठी शेणखत म्हणून उपयोगात येत होती. या जनावरांची विष्ठाच खताचे काम करीत होती.
शेणखत जमिनीसाठी अत्यंत पोषक ठरत होते. त्यामुळे शेतजमिनीतील पोषक तत्वांना बळ मिळत होते. जमिनीतील पोषक तत्वांना शेणखतापासून कोणतीही हानी पोहोचत नव्हती. सोबतच पूर्णपणे निरोगी पिकांपासून शेतकऱ्यांना भाजीपाला व इतरही पिके घेता येत होती. परिणामी उत्पादनाचा दर्जाही अत्यंत चांगला राहत होता. पीक कसदार निपजत होते. त्यामुळे मनुष्यालाही कसदार अन्न मिळत होते.
शेणखतामुळे शेतीत उत्पन्नही भरपूर होत होते. विशेष म्हणजे, ते सर्व कसदार राहत होते. पूर्वी शेतकरी खंडीचा हिशेब लावून, खंडीने उत्पन्न झाले, अशी चर्चा करीत होते. वयोवृद्ध शेतकरी गावातील पारावर बसून उत्पादनाबाबत चर्चा करीत होते. खरीप आणि रब्बी पिकांवर कोणत्याही रोगांनी आक्र मण केले की, शेतकरी आपसात चर्चा करून त्यावर उपाययोजना करीत होते. मात्र कालांतराने ही पद्धतच मोडीत निघाली.
आता कोणत्याही गावात हे चित्र दिसून येत नाही. पीक चांगले राहण्याकरिता आता शेतकरी रासायनिक खतांचा भरमसाट वापर करतात. त्यामुळे शेतजमिनीचा पोतच खालावत आहे. सोबतच जमिनीतील अत्यंत सुपीक आणि पोषक तत्वे नष्ट होत आहेत. सध्या पिकांना रासायनिक खतांचा डोज न दिल्यास उत्पन्नात घट येत असल्याचेही दिसून येते.
परिणामी शेतकरीही त्यांचा अती वापर करतात. अधिक उत्पन्नासाठी त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. सिंचन सुविधा तोकडी असल्याने त्यांना कोरडवाहू जमिनीतूनच जादा उत्पन्न घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत आहे.
पूर्वी शेतकरी कोरडवाहू शेतात वांगोडे तयार करून त्यात भाजीपाला लागवड करायचे. त्यावर त्यांचा घरगुती खर्च भागत असे. मात्र सध्या कोरडवाहू शेतातून हे वांगोडे नष्ट झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी कोरडवाहू शेतात भाजीपाला लावणेच बंद केले आहे.
कीटकनाशक फवारणीमुळे होणारे नुकसान
आता शेतकरी रासायनिक खतांचा वापर जादा प्रमाणात करतात. त्यामुळे सुपीक शेतजमीन आता बंजर होण्याची शक्यता बळावली आहे. शेतीत अधिक उत्पन्न घेण्याकरिता रासायनिक खतांसोबतच दिवसेंदिवस महागड्या कीटकनाशकांचाही अत्यधिक वापर होऊ लागला आहे. या किटकनाशकांमुळे शेतातील ज्या वनस्पती पिकांसाठी उपयोगी ठरतात, त्या वनस्पती व पोषक तत्वे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. किटकनाशकांच्या फवारणीमुळे त्यांना धोका निर्माण झाला आहे. वारंवार आणि अधिक रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीलाही आता रासायनिक खतांची सवय झाली आहे.