घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प ठरला अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 12:49 AM2019-03-09T00:49:15+5:302019-03-09T00:50:58+5:30
सन १९१९ मध्ये स्थापना झालेल्या गोंदिया नगर परिषदेकडे आजही घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही. आजवर तसाच कारभार चालत असला तरी प्रकल्प नसल्याचा फटका नगर परिषदेला यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात बसला. नगर परिषदेचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याने सर्वेक्षणात कमी गुण मिळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सन १९१९ मध्ये स्थापना झालेल्या गोंदिया नगर परिषदेकडे आजही घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही. आजवर तसाच कारभार चालत असला तरी प्रकल्प नसल्याचा फटका नगर परिषदेला यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात बसला. नगर परिषदेचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याने सर्वेक्षणात कमी गुण मिळाले. तिथेच शहराची रँकींग घसल्याची माहिती आहे. यामुळे स्वच्छ सर्वेक्षणातील घसरणीला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पच कारणीभूत ठरल्याची माहिती आहे.
स्वच्छ सर्वेक्षणातंर्गत नगर परिषदांना विविध प्रकारचे मुद्दे ठरवून देत त्यावर गुणांकन केले जाते. स्वच्छ सर्वेक्षण असल्याने घनकचरा व्यवस्थापन ही बाब मुख्य राहणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अशात शहरात निघणाऱ्या घनकचऱ्याचे व्यवस्थापन कुठे व कसे केले जाते हा विषय येणार होताच. मात्र नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पच नसल्याने स्वच्छ सर्वेक्षणात हीच बाब कमकुवत ठरली व नेमके येथेच कमी गुण पडल्याची माहिती आहे. मागील वर्षी केंद्रात ७६ व राज्यात १७ व्या क्र मांकावर असलेले गोंदिया शहर यंदा घसरले असून केंद्रात १२९ तर राज्यात ३५ व्या क्रमांकावर आले आहे.
गोंदिया नगर परिषदेची स्थापना १९१९ मध्ये झाली. म्हणजेच, आता शंभरीत असलेल्या गोंदिया नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसणे ही आश्चर्यजनक व तेवढीच संतापजनक आहे. विशेष म्हणजे, प्रकल्पासाठी नगर परिषदेने जागा शोधली मात्र तेथे काही ना काही अडचण येत असल्याने प्रकल्प रेंगाळत चालला आहे. परिणामी आजपर्यंत नगर परिषदेचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभे झाले नाही. मात्र यासाठी १०० वर्षांचा काळ लागणे हे काही संयुक्तीक वाटत नाही.
अखेर त्याचा फटका नगर परिषदेला बसत आहे. यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात नगर परिषदेला डच्चू मिळालाच. जिल्ह्यातील लहान लहान नगर पंचायती सुध्दा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारत असताना गोंदिया नगर परिषद यात मागे पडणे हा सुध्दा आश्चर्याचा विषय आहे.
संबधित अभियंत्याचा मोबाईल नेहमीच बंद
स्वच्छ सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आलेल्या संबंधित अभियंत्याला कोणतीही माहिती मागण्यासाठी मोबाईलवर संपर्क केल्यास त्यांना मोबाईल नेहमीच बंद राहतो. त्यामुळे शहरातील स्वच्छतेच्या विषयाला घेऊन काय सुरू आहे जाणून घेणे कठीण झाले आहे. मोबाईल बंद ठेवण्याच्या या सवयीमुळे नागरिकांसह खुद्द नगर परिषद अधिकारीही वैतागले आहेत. मुख्याधिकारी सुद्धा ही बाब जाणून आहेत. मात्र आतापर्यंत अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही हा सवाल मात्र गुलदस्त्यात आहे.
प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे
नगर परिषदेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प व्हावा यासाठी नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या पुढाकाराने ग्राम रतनारा येथे जागा पाहण्यात आली आहे. मात्र त्या जागेसाठी लागणाºया विविध परवानगींसाठी हा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात आला आहे. यावर जिल्हाधिकाºयांनी एक समिती तयार केल्याची माहिती प्रशासनीक अधिकारी सी.ए.राणे यांच्याकडून मिळाली.मात्र आता त्यावर लवकरच कारवाई होणे अपेक्षीत असून असे झाल्यास लवकरच प्रकल्प उभारता येईल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.