प्रतिसाद नसल्याने ग्रामीण भागातील काही फेऱ्या अद्याप बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:19 AM2021-07-19T04:19:20+5:302021-07-19T04:19:20+5:30
गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात चांगलाच कहर केला होता. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरीही कोरोना पूर्णपणे ...
गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात चांगलाच कहर केला होता. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरीही कोरोना पूर्णपणे संपलेला नसून दुसऱ्या लाटेतील ती स्थिती आठवताच अंगाला थरकाप सुटतो अशी स्थिती आहे. परिणामी नागरिकांमध्ये कोरोनाला घेऊन आजही दहशत असून दुसरी लाट ओसरत असतानाच आता तिसऱ्या लाटेबाबत अंदाज वर्तविले जात आहेत. अशात आजही कित्येक नागरिक प्रवास टाळत असून गरज पडल्यास स्वत:च्या वाहनानेच प्रवास करताना दिसतात. ही बाब राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या अंगलट येत असून एसटीला प्रवासी प्रतिसाद दिसत नाही. राज्याने निर्बंध शिथिल केले व लालपरी पुन्हा रस्त्यावर धावू लागली आहे. अशात आगाराने एसटीच्या फेऱ्या सुरू केल्या होत्या; मात्र त्यास प्रवासी प्रतिसाद न मिळाल्याने व डिझेलचा खर्च ही निघत नसल्याने काही फेऱ्या बंद कराव्या लागल्या आहेत.
-----------------------------
आगारातील एकूण बस - ८१
कोरोनाआधी दररोज होणाऱ्या फेऱ्या - ३५०
सध्या सुरू असलेल्या फेऱ्या - १३०
--------------------------------
गावखेड्यांत धावत आहे ऑटो
प्रवासी प्रतिसाद नसल्याने महामंडळाने एसटीच्या फेऱ्या बंद केल्या. परिणामी अशा भागातील ग्रामीणांना बाहेर जायचे असल्यास ऑटोचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे ऑटोवाल्यांनाही हातभार लागत असून यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालत आहे.
---------------------------
मुख्य मार्गांवरच एसटीची दौड
१) ग्रामीण भागातून प्रवासी प्रतिसाद नसल्याने जेथे ३५० फेऱ्या होत्या. त्याच आता १३० वर आल्या असूनही जेमतेम डिझेलचा खर्च निघत आहे.
२) मागील २ महिन्यांत सुमारे १९००० किमी एसटी धावली असून सुमारे २.५० लाखांचे उत्पन्न यातून आले असेल अशी स्थिती आहे.
३) प्रतिसाद नसल्याने दवनीवाडा, बोदा, बोळूंदा, हिरापूर, दासगाव, किन्ही, गिरोला, परसवाडा, जांभळी आदी ग्रामीण फेऱ्या बंदच आहेत.
---------------------
खेडेगावावरच अन्याय का ?
सुमारे ५-६ महिन्यांपूर्वी एसटी येथे येत होती; मात्र दुसऱ्या लाटेनंतर आता एसटीची फेरी बंद पडली आहे. त्यामुळे आम्हाला कामानिमित्त आता गोंदियाला जायचे असल्याने आपल्या वाहनाने जावे लागते. एसटीची फेरी सुरू झाल्यास या परिसरातील नागरिकांना सोयीचे होणार.
- विलास गायधने (शिवनी, आमगाव)
---------------------------
पूर्वी या भागात एसटी येत असल्याने प्रवासाची सोय होती. मात्र आता ग्रामीण भागातल्या फेऱ्या बंद दिसत आहेत. त्यामुळे आम्हाला गोंदियाला व अन्यत्र जायचे असल्यास आता प्रवासी वाहनांची सोय नाही. त्यामुळे आपल्या वाहनानेच जावे लागते. एसटीच्या फेऱ्या सुरू झाल्यास नागरिकांची सोय होणार.
-
-----------------------------
कोट
ग्रामीण भागातील फेऱ्या सुरू केल्या होत्या; मात्र प्रवासी प्रतिसाद नसल्याने डिझेलचाही खर्च निघत नव्हता. परिणामी ग्रामीण भागातील काही फेऱ्या बंद कराव्या लागल्या. प्रवासी प्रतिसाद वाढल्यास त्यांना पुन्हा सुरू करता येईल.
- यु.एन.उईके
वाहतूक निरीक्षक, गोंदिया आगार.
५) आगारप्रमुखाचा कोट