कधी पैशांसाठी पाऊस तर कधी पुत्रप्राप्तीसाठी भानामती : अंधश्रध्देचे भूत कधी उतरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:28 AM2021-08-29T04:28:38+5:302021-08-29T04:28:38+5:30

गोंदिया : कुठल्याही गोष्टीची लालच ही माणसाला खाईत टाकते. अंधश्रध्देच्या आहारी गेलेल्या लोकांना मूर्ख बनवून त्यांच्याकडून पैसा घेणे, जादूटाेणा, ...

Sometimes rain for money and sometimes for childbirth Bhanamati: When will the ghost of superstition come down? | कधी पैशांसाठी पाऊस तर कधी पुत्रप्राप्तीसाठी भानामती : अंधश्रध्देचे भूत कधी उतरणार?

कधी पैशांसाठी पाऊस तर कधी पुत्रप्राप्तीसाठी भानामती : अंधश्रध्देचे भूत कधी उतरणार?

Next

गोंदिया : कुठल्याही गोष्टीची लालच ही माणसाला खाईत टाकते. अंधश्रध्देच्या आहारी गेलेल्या लोकांना मूर्ख बनवून त्यांच्याकडून पैसा घेणे, जादूटाेणा, भानामती याची भीती दाखविणे, पैसा कमविण्यासाठी नरबळी, कासवाचा संग्रह, पुत्रप्राप्तीसाठी भानामती करण्याचे प्रकार सुरूच असतात. या अंधश्रध्देच्या आहारी जाऊन निरपराध लोकांचा अमानूष छळ करण्याचे प्रकार होत असतात. जिल्ह्यात अनेक प्रकार पुढे येत असतात.

विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी अनेकांच्या डोक्यात असलेले अंधश्रद्धेचे भूत कायम आहे. ते भूत उतरायला तयार नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून वारंवार जनजागृती केली जाते. परंतु अंधश्रध्देचा कळस गाठतच जातो. महाराष्ट्रात अंधश्रध्देला खतपाणी घातला जाऊ नये म्हणून २६ ऑगस्ट २०१३ ला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा कडक स्वरूपात पुढे आणण्यात आला. या प्रकाराची तक्रार कुणी पोलीस ठाण्यात केली तर त्यासंदर्भात गुन्हा दाखल करणे पोलिसांना गरजेचे आहे. या प्रकरणातील आरोपींना पोलीस ठाण्यातून जामीन मिळत नसून तो न्यायालयातूनच घ्यावा लागतो. कमीत कमी ६ महिने तर जास्तीत जास्त ७ वर्ष शिक्षा, ५ हजार ते ५० हजारांपर्यंतचा दंड या कायद्यांतर्गत करण्यात येतो. दखलपात्र स्वरूपाचा हा गुन्हा असून याची कडक अमंलबजावणी करणे गरजेचे आहे.

......................

सहा वर्षात १५ गुन्हे दाखल

अंधश्रध्देला खतपाणी घालणाऱ्या घटना गोंदिया जिल्ह्यात अधूनमधून होत असतात. मागील सहा वर्षात अंधश्रध्देला खतपाणी घालणाऱ्या घटनात १५ गुन्हे दाखल झाले आहेत. सन २०१५ नंतर या कायद्याची जनजागृती जोमाने होऊ लागली आहे. उध्दव ठाकरे सरकारने या कायद्याच्या जनजागृतीसाठी १० कोटी रुपये दिलेत. परंतु कोरोनामुळे जनजागृती होऊ शकली नाही.

..............

भानामती कसली, हे तर खेळ विज्ञानाचे

१) गोरेगाव तालुक्याच्या घोटी येथील एका लहान मुलाला सापाने दंश केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. परंतु मृत पावलेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा बालाघाटच्या कटंगी येथील डॉक्टरने केला होता. त्या मुलावर उपचार करून त्याला जिवंत करून द्यावे म्हणून ३०० लोक रस्त्यावर उतरून त्यांनी आंदोलन केले होते. त्या ३०० लोकांवर या अंधश्रध्देपायी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

....

२) गोंदिया तालुक्याच्या मंगेझरी एका इसमावर ४ ते ५ वर्षाआधी जादूटोण्याचा संशय घेऊन ८ ते ९ लोकांनी त्या इसमाला फरफटत नेऊन होळीच्या दिवशी जिवंत जाळले होते. अशीच एक घटना अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या झरपडा येथे घडली होती. दोघांना जादूटोण्याच्या संशयातून मारहाण केली होती. यात १२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

........................

सरकारने केलेला अंधश्रध्दा निर्मूलन कायदा अत्यंत कडक आहे. परंतु अजूनही या कायद्याची पुरेपूर जाणीव नसल्यामुळे या कायद्याची अमंलबजावणी होत नाही. दखलपात्र स्वरूपाच्या गुन्ह्याला अदखलपात्र नोंद करू नये. या कायद्याची जनजागृती जनता आणि पोलिसात करण्यासाठी उध्दव ठाकरे सरकारने १० कोटी रुपये दिले आहेत. परंतु कोरोनामुळे जनजागृती होऊ शकली नाही.

- डॉ. प्रकाश धोटे, जिल्हा संघटक, अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती गोंदिया

Web Title: Sometimes rain for money and sometimes for childbirth Bhanamati: When will the ghost of superstition come down?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.