सोंदलागोंदी झाडांना राख्या बांधणारे गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 09:48 PM2019-01-31T21:48:59+5:302019-01-31T21:49:20+5:30
वृक्षसंवर्धनाचा केवळ देखावा न करता दर रक्षाबंधनाला झाडाला राखी बांधून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प तालुक्यातील सोदलागोंदी येथील गावकरी मागील आठ ते दहा वर्षांपासून करीत आहे. झाडावर प्रेम करणारी, झाड जगविणारे, रक्षाबंधनाच्या दिवशी झाडांना राखी बांधणारे गाव, अशी या गावाची ओळख निर्माण झाली आहे.
दिलीप चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : वृक्षसंवर्धनाचा केवळ देखावा न करता दर रक्षाबंधनाला झाडाला राखी बांधून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प तालुक्यातील सोदलागोंदी येथील गावकरी मागील आठ ते दहा वर्षांपासून करीत आहे. झाडावर प्रेम करणारी, झाड जगविणारे, रक्षाबंधनाच्या दिवशी झाडांना राखी बांधणारे गाव, अशी या गावाची ओळख निर्माण झाली आहे.
सोंदलागोंदी येथे ३४ कुटुंब वास्तव्यास आहेत. व्यसनमुक्त गाव सोंदलगोंदीची वन समिती झाडांचे रक्षण करण्याचे काम करते. नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सीमा व गावाची सीमा एकच. २००७ या वर्षी सोंदलागोंदीतील निसर्ग प्रेमींनी वनविभागाला विश्वासात घेऊन संयुक्त वन व्यवस्थापन समितीची स्थापना केली. पुढे या समितीने वनांचा चेहरामोहराच बदलवून टाकला. श्रमदानातून वनबंधारे बांधून पाणी साठवण क्षमता वाढविण्यात महत्वाची भूमिका निभावली. समितीच्या उत्पन्नातून हातभार लावून समाजभवन व मोहफुलाकरिता साठवण केंद्र तयार केले आहे. सोंदलगोंदी निसर्गाच्या सानिध्यात घनदाट जंगलात वसलेले केवळ ३४ कुटुंबियाचे गाव. नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सीमा या गावापासूनच सुरु होते. या गावाच्या काही अंतरावर महादेव पहाडी आहे. या पहाडीवर भगवान शंकराचे मंदिर आहे. त्यालाच लागून मोठे तलाव, वनविभागाची रोपवाटीका आणि निसर्गाची झालर लाभली आहे. सोंदलागोंदीच्या पश्चिम दिशेत भगवान शंकराचे मंदिर आहे. या मंदिराची अवस्था आता मात्र बिकट आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे इथे येणाऱ्या भाविकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. येथील निसर्गाच्या अप्रतिम देखावा पहावयास मिळतो. काही वर्षापूर्वी वनविभागाने या मंदिराच्या अवतीभवती बांबुच्या झोपड्या (कुटी), बांबुपासून खुर्च्या, बांबुचे प्रवेशद्वार बनविले होते. मात्र हे सर्व आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. भगवान शंकराच्या प्रवेशद्वारासमोरुन बनविलेले बांबुचे गोलाकार भुयारही विस्कळीत झाले आहे.
जिल्हा प्रशासनाने या परिसराचा पर्यटन व तीर्थक्षेत्र स्थळ म्हणून सर्वांगिन विकास केल्यास पर्यटन विकासाला चालना मिळू शकते. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
वनविभागाची रोपवाटिका
सोंदलागोंदीच्या रोपवाटिकेत विविध प्रजातीची दर्जेदार रोपटी पहावयास मिळतात. रोपट्याच्या योग्य संवर्धनासह पाणी, खत, फवारणी याचाही योग्य पद्धतीने वापर करण्यात आला. प्लास्टिक पिशव्यांमध्ये माती शेण खत व रेतीच्या योग्य मिश्रणात ही रोपवाटिका जगविण्यात आली. रोपवाटीकेत नक्षीदार बांबुच्या खुर्च्या, बेंच लक्ष वेधून घेतात.
सोंदलागोदी येथील नागरिकांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांची झाडांविषयी आपुलकी आजही पहावयास मिळते.झाड जगविण्यापासून तर झाडांना राखी बांधून झाडे जगविण्याचा संकल्प हे खरोखरच प्रशंसनिय आहे.
-एस.एम.जाधव, वनपरिक्षेत्राधिकारी गोरेगाव.