‘गंगाबाई’त सोनोग्राफी बंद
By admin | Published: July 7, 2016 01:57 AM2016-07-07T01:57:04+5:302016-07-07T01:57:04+5:30
केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय व बाई गंगाबाई महिला रूग्णालय या दोन्ही ठिकाणी सोनोग्राफी प्रक्रियेचे काम सुरू होते.
बीजीडब्ल्यू रूग्णालय : प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सकाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
गोंदिया : केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय व बाई गंगाबाई महिला रूग्णालय या दोन्ही ठिकाणी सोनोग्राफी प्रक्रियेचे काम सुरू होते. परंतु परंतु प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सकांनी एक नवीन आदेश जारी केले. त्यामुळे आता केटीएस रूग्णालयात दोन रेडिओलॉजिस्ट झाले व बाई गंगाबाई महिला रूग्णालयात एकही रेडिओलॉजिस्ट नाही. त्यामुळे महिला रूग्णालयात सोनोग्राफीची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प पडली आहे.
या प्रकारामुळे बाई गंगाबाई महिला रूग्णालयात सोनोग्राफी करण्यासाठी येणाऱ्या महिलांना मोठाच त्रास सहन करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर गरजू महिलांना बाहेरून सोनोग्राफी करावी लागत आहे. त्यामुळे त्यांना अधिकचा आर्थिक खर्च सहन करावा लागत आहे.
केटीएस जिल्हा रूग्णालय व बाई गंगाबाई महिला रूग्णालय ही दोन्ही शासकीय रूग्णालये आहेत. दोन्ही रूग्णालयात गरीब वर्गातील लोक उपचारासाठी येतात. परंतु रूग्णालय व्यवस्थापन या संदर्भात विचार करीत नाही. त्यामुळे रूग्णांना बाहेरच्या उपचाराचा सल्ला दिला जातो. गरीब रूग्णांना नेहमी अकारण आपले खिशे खाली करावे लागतात. नुकतेच डॉ. अमरीश मोहबे यांंना केटीएस जिल्हा रूग्णालयात प्रभारी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सकांचा पदभार सोपविण्यात आला आहे.
प्रभार ग्रहण करताच डॉ. मोहबे यांनी केटीएस रूग्णालयात कार्यरत रेडियोलॉजिस्ट डॉ.के.एन. घोडेस्वार यांचे स्थानांतरण बाई गंगाबाई महिला रूग्णालयात केले. तर बाई गंगाबाई महिला रूग्णालयात कार्यरत डॉ.आर.बी. चहांदे यांना केटीएस रूग्णालयात आणले. मात्र डॉ. घोडेस्वार यांनी गंगाबाई महिला रूग्णालयात जाण्यास नकार दिला. त्यामुळे केटीएस रूग्णालयात आता दोन सोनोग्राफी तज्ज्ञ चिकित्सा अधिकारी झाले व बाई गंगाबाई महिला रूग्णालयात एकसुद्धा अधिकारी राहिला नाही. त्यामुळे महिला रूग्णालयात सोनग्राफीसाठी येणाऱ्या महिलांना मोठीच समस्या होत आहे. प्रभारी अधिकाऱ्यांच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वास्तविकपणे डॉ.के.एन. घोडेस्वार यांना राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत केटीएस रूग्णालयात नियुक्त करण्यात आले. तर डॉ.आर.बी. चहांदे चिकित्सा अधिकारी आहेत. त्यांची पोस्टींग केटीएस रूग्णालयात करण्यात आली, मात्र त्यांना प्रतिनियुक्तीवर बीजीडब्ल्यू रूग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यांनी आपली प्रतिनियुक्ती रद्द करण्याची मागणीसुद्धा केली नव्हती. अशात सदर निर्णय कसेकाय घेण्यात आले, यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आत बीजीडब्ल्यू रूग्णालयातील या समस्येचा निपटारा डॉ. मोहबे कसे करतात, हे पाहावे लागेल. विशेष म्हणजे डॉ. मोहबे यांची नियुक्ती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून बाई गंगाबाई महिला रूग्णालयात करण्यात आली आहे. ते प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक बनले आहेत व गोंदिया मेडीकल कॉलेजमध्येसुद्धा एका खोलीनंतर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ. मोहबे यांच्या नावाची पाटी लागली आहे.
अशाप्रकारे का अनेक ठिकाणी एकाच अधिकाऱ्याच्या नावाचा उपयोग केला जात आहे? डॉ. अमरीश मोहबे यांनी सोनोग्राफी तज्ज्ञाची नियुक्तीसुद्धा याच रितीने करवून घेतली का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र सोनोग्राफीसाठी गैरसोय झालीच, एवढे खरे. (प्रतिनिधी)