लालपरीची गती मंदावताच, टपाल खाते कोडमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:27 AM2021-04-18T04:27:40+5:302021-04-18T04:27:40+5:30
गोंदिया : सर्वत्र करोनाची रुग्णवाढ होत असल्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन या अभियानांतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ...
गोंदिया : सर्वत्र करोनाची रुग्णवाढ होत असल्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन या अभियानांतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंधरा दिवसांची संचारबंदी व कडक निर्बंधाची घोषणा केली. याअंतर्गत सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे घोषित केले. मात्र, एसटी सेवा बंद असल्याने ग्रामीण भागातील टपाल सेवा कोलमडल्याचे चित्र आहे.
कोरोना संसर्गामुळे बचत व्यवहार करणे जिकिरीचे झाले आहे. त्यावर उपाय म्हणून भारतीय डाक विभागाने बचत खात्यामार्फत इंटरनेट बॅंकिंग, मोबाईल बॅंकिंग सेवाही उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ग्राहकांना घरबसल्या बॅंकिंग व्यवहार करणे शक्य झाले आहे. कोरोनाच्या अडचणीच्या काळात डाक खात्याने औषधे, उपकरणे, पोहोचविण्याची सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. अशावेळी पुन्हा लाॅकडाऊनची स्थिती निर्माण झाल्यामुळे प्रवासी मिळत नसल्याचे कारण पुढे करून गोंदिया आगाराने ग्रामीण भागात लालपरीची फेरी बंद केली. त्यामुळे टपाल ग्राहकांचे महत्त्वाचे दस्तऐवज डेपोतच पडून असल्याचे चित्र आहे. देवरी तालुक्यासह ग्रामीण भागात तीन दिवसांपासून डाक डाकघरांत पोहोचलीच नाही. याकडे जिल्हाधिकारी गोंदिया यांनी लक्ष देऊन डाक व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांनी केली आहे.
......
मागील ३ दिवसांपासून डाक गोंदियावरून परिवहन व्यवस्थेमुळे येत नसल्यामुळे गैरसोय होत आहे.
-विशाल भित्रे पोस्टमास्तर,डाकघर देवरी.
.....
शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवेतील प्रवासी देवरी येथे ये-जा करण्यास मिळत नसल्यामुळे परिवहन विभागाला डाक पाठविण्याकरिता वाहन पाठविणे शक्य नाही व परवडणारे नाही.
-संजना पटले
आगार व्यवस्थापक
.....