मंत्रीपद जाताच इच्छुकांच्या आशा पल्लवीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 09:41 PM2019-07-07T21:41:35+5:302019-07-07T21:42:26+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे आता वेगाने वाहू लागले आहेत. निवडणुकीपूर्वीच बॅनरमधून नवनवीन चेहरे आता झळकू लागले आहेत. यात काही चेहऱ्यांशी तर राजकारणाशी सोयरसुतक दिसून येत नाही, तर काही ‘ट्राय अगेन’ असे आहेत. प्रत्येक राजकीय पक्षात उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येत आहे.
संतोष बुकावन।
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे आता वेगाने वाहू लागले आहेत. निवडणुकीपूर्वीच बॅनरमधून नवनवीन चेहरे आता झळकू लागले आहेत. यात काही चेहऱ्यांशी तर राजकारणाशी सोयरसुतक दिसून येत नाही, तर काही ‘ट्राय अगेन’ असे आहेत. प्रत्येक राजकीय पक्षात उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येत आहे. मात्र ऐनवेळी अनपेक्षित नाव पुढे येण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.
२००८ च्या परिसीमन आयोगाच्या शिफारशीनंतर अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघ २००९ मध्ये अस्तित्वात आला. हा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघाचे आमदार राजकुमार बडोले आहेत. युती शासन काळात त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. मात्र विधानसभा निवडणुकीला केवळ चार महिने शिल्लक असतांना मंत्रिमंडळ विस्तार झाला व त्यात बडोलेंचे मंत्रिपद गेले.
भंडारा गोंदिया विधान परिषदेचे सदस्य डॉ. परिणय फुके यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागली. बडोलेंचे मंत्रिपद जाताच अगदी त्याच दिवशी इच्छुकांचे बॅनर सुद्धा झळकले. आगामी विधानसभा निवडणुकीत बडोलेंना उमेदवारी मिळणार की नाही, याचीही मतदारसंघात चर्चा आहे. या मतदारसंघात भाजप व काँग्रेस पक्षाचे अनेक इच्छुक उमेदवारीसाठी शड्डू ठोकून आहेत.
लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपाला मिळालेली आघाडी टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. तर दोनदा झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याचे आव्हान काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससमोर उभे ठाकले आहे. गत विधानसभा निवडणुकीत युती व आघाडीचे सूत जुळले नाही. परिणामत: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेनेला स्वबळावर लढण्याची वेळ आली होती. याचा लाभ भाजपाला मिळाला होता. मात्र यावेळी आघाडी हा धोका पत्करण्यास धजावेल अशी परिस्थिती सध्यातरी दिसून येत नाही. मात्र ऐनवेळी काय होईल हे भाकीत करणे तूर्तास चुकीचे ठरेल. यापूर्वी आघाडीची जागा दोनदा काँग्रेसच्या वाट्याला आली होती. या जागेवर २००९ व २०१४ मध्ये भाजपचा विजय झाला होता. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस या जागेची मागणी करणार असल्याची चर्चा आहे. दावे-प्रतिदाव्यात ही जागा नेमकी कुणाच्या वाट्याला जाईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
मतदारसंघाचा मागोवा
अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्र हा सडक अर्जुनी व गोरेगाव तालुक्यातील मोहाडी महसूल मंडळ मिळून तयार झाला आहे. २००८ च्या मतदारसंघाच्या निर्मितीनंतर २००९ व २०१४ या दोन विधानसभेच्या निवडणुका येथे पार पडल्या. या क्षेत्रात आदिवासींची लोकसंख्या २१.५६ टक्के एवढी आहे. या विधानसभा क्षेत्रात आजवर भाजपचे वर्चस्व दिसून आले आहे. २००९ व २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे राजकुमार बडोले निवडून आले आहेत.यावेळची विधानसभा निवडणूक मात्र आव्हानात्मक असेल. यावेळी बहुजन वंचित आघाडी कुणाची बिघाडी करेल ते पाहणे रंजक ठरेल. एमआयएम व मनसे या पक्षांची भूमिका निर्णायक ठरू शकते.