मतदान आटोपताच मजुरांची शहराकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:25 AM2021-01-17T04:25:21+5:302021-01-17T04:25:21+5:30
केशोरी : परिसरात औद्योगिक विकासाचा अभाव असल्यामुळे सुशिक्षित युवकांबरोबर मजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे येथील बेरोजगार पुणे, मुंबई, नाशिक, ...
केशोरी : परिसरात औद्योगिक विकासाचा अभाव असल्यामुळे सुशिक्षित युवकांबरोबर मजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे येथील बेरोजगार पुणे, मुंबई, नाशिक, आंध्रप्रदेश, तेलंगणा व कर्नाटक येथे जाऊन आपला उदरनिर्वाह करतात. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मजूर गावाकडे आले होते. आता मतदान आटोपताच त्यांनी आपल्या परत जाण्यासाठी वाट धरली आहे.
केशोरी परिसर जंगल वेढलेला असून नैसर्गिक वनसंपतीने नटलेला आहे. वास्तविक नैसर्गिक वनस्पतीपासून औषध निर्मिती करण्यासाठी उपयोग करून औद्योगिक विकास होणे अपेक्षित आहे. परंतु राजकीय मंडळींच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे या परिसराचा औद्योगिकदृष्ट्या विकास खुंटला आहे. त्यामुळे या भागातील सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम नाही. अशात आपला उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना आंधप्रदेश, तेलंगणा, कर्नाटकसह मुंबई, पुणे व नाशिक शहराकडे धाव घ्यावी लागते. सध्या या भागातील काही ग्रामपंचायतींची निवडणूक होती व त्यात मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी ते गावाकडे आले होते.
मात्र आता मतदान आटोपताच त्यांनी परत शहरांकडे धाव घेतली आहे. अशाच परत निघालेल्या कुटुंबाची भेट घेऊन संवाद साधला असता त्यांनी, आपल्या परिसरात कोणत्याच प्रकारचे काम नाही. कदाचित रोजगार हमीची कामे सुरू असती तर बाहेर जाऊन भटकंती करण्याचा प्रश्नच उद्भवला नसता. आमच्या हाताला कोणत्याही प्रकारची कामे मिळून आमचा उदरनिर्वाह झाला पाहिजे. गाव सोडून बाहेर जाण्याची मुळात इच्छा नसते. मात्र नाईलाजास्तव कामाच्या शोधात बाहेर जाणे भाग पडत असल्याचे दु:ख एका सुशिक्षित बेरोजगाराने ‘लोकमत’ प्रतिनिधीजवळ व्यक्त केले.