सुटबुटातील स्वच्छता दूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 10:40 PM2018-12-30T22:40:08+5:302018-12-30T22:40:56+5:30
देश स्वतंत्र होण्यापेक्षाही स्वच्छताही अधिक महत्वाची आहे, असे राष्ट्रपिता महात्मा गांधी मानत असत. त्यामुळेच स्वच्छ व स्वयंपूर्ण खेडी करण्याचा त्यांचा मानस होता. परंतु काळाच्या ओघात खेड्यांकडे दुर्लक्ष झाले. गल्ली बोळातील कचऱ्याने तर मोठे संकट उभे केले.
दिलीप चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : देश स्वतंत्र होण्यापेक्षाही स्वच्छताही अधिक महत्वाची आहे, असे राष्ट्रपिता महात्मा गांधी मानत असत. त्यामुळेच स्वच्छ व स्वयंपूर्ण खेडी करण्याचा त्यांचा मानस होता. परंतु काळाच्या ओघात खेड्यांकडे दुर्लक्ष झाले. गल्ली बोळातील कचऱ्याने तर मोठे संकट उभे केले. शेवटी स्वच्छतेसाठी लोकचळवळ उभारणे सरकारला क्रमप्राप्त ठरले. मात्र सध्यास्थितीत स्वच्छता अभियान केवळ कागदावरच असल्याचे पाहून एका तेवीस वर्षाच्या अधिकाऱ्यांने कुठलीही तमा न बाळगता गोरेगाव शहरात स्वच्छतेचा विडा उचलला. सुट बुटातील स्वच्छता दूताला पाहुन सर्वांनाच आश्चर्यचा धक्का बसल्या शिवाय राहणार नाही.
विठ्ठल कवठे राहणार बोहिंदे (सोलापूर) असे त्यांचे नाव आहे. ते गोरेगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. विठ्ठल कवठे सप्टेंबर २०१८ ला गोरेगावच्या तालुका कृषी कार्यालयात रुजू झाले. तेव्हापासून ते सकाळी एक तास व सायंकाळी एक तास स्वच्छता अभियान एकटेच राबवितात.
दोन्ही हातात मौजे, पाठीवर, लॅपटॉपची बॅग व एका हातात डस्टबिन घेवून जिथे कचरा दिसेल तेथे जाऊन कचरा उचलतात व तो कचरा कचरा पेटीत टाकतात. मागील चार महिन्यांपासृून ते गोरेगाव नगरवासीयांना सेवा देत आहे. रविवारी (दि.३०) सकाळी ८ वाजता स्वच्छता अभियान राबवितांना ते लोकमत प्रतिनिधीच्या नजरेस पडले. विठ्ठल कवठे यांनी आजपर्यंत बºयाच जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबविले आहे.
विशेष म्हणजे ते कुठेही गेले तरी त्यांची डस्टबिन त्यांची साथ सोडत नाही. शनिवारी (दि.२९) ला विदर्भ एक्सप्रेस या ट्रेनने गोंदियाला येत असताना त्यांनी रेल्वे गाडीत कचरा उचलून स्वच्छता मोहीम राबविली. कर्तव्यावर असताना दोन तास तर सुटीच्या दिवशी चार तास स्वच्छता अभियान राबविणे असा त्यांचा नित्यक्रम आहे. सोलापूर जिल्ह्यातील बोहिंदे या खेडेगावात विठ्ठलचा जन्म झाला.
ज्या समाजात आपण जगलो मोठे झालो त्या समाजासाठी काही घेणे अन देणे आहे. या विचाराचा त्याच्या आयुष्यावर मोठा प्रभाव आहे. ही संपूर्ण भूमी कचरामुक्त झाली पाहिजे या हळव्या ध्यासाप्रती आपण अखंड स्वच्छता अभियान राबविणार असल्याचे त्यांनी लोकमतला सांगीतले.
कार्यालयीन वेळेवर शासनाचे कामे करायची व उर्वरीत वेळेवर स्वच्छता अभियानात स्वत:ला झोकून द्यायचे या उर्मीने विठ्ठल काम करतो. गेल्या चार महिन्यापासून विठ्ठल गोरेगाव शहरात स्वच्छता अभियान राबवित असला तरी असंवेदनशिल गोरेगाववासीयांनी विठ्ठलाच्या दोन हाताला चार करण्याचे धाडस दाखविले नाही. आजही विठ्ठल एकटाच कचरा उचलतो एकटाच पुढे जातो मागे मात्र असंवेदनशिल लोकांचा साधा मागमुसही नाही.
डस्टबिनची साथ सोडली नाही...
सध्या काहीजण स्वच्छता अभियान हे केवळ फोटो सेशन पुरते करतात. त्यानंतर ते कधीही स्वच्छतेसाठी प्रयत्न करीेत नाही. मात्र विठ्ठल कवठे हे कुठेही गेले तरी त्यांच्यासोबत डस्टबिन कायम असतो. ते रस्त्यावरील व रेल्वे गाडीने प्रवास करीत असताना कचरा गोळा करुन डस्टबीनमध्ये टाकतात. हा त्यांचा नित्यक्रम मागील काही वर्षांपासून सुरू आहे.
स्वयंप्रेरणेतून स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. स्वच्छता स्वत:पासून झाली पाहिजे. स्वच्छ परिसर ठेवणे व स्वच्छता राखणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ही भावना ज्यावेळी प्रत्येकाच्या मनात येईल तेव्हा मात्र ही भूमी कचरा मुक्त होईल.
-विठ्ठल कवठे, मंडळ अधिकारी, कृषी कार्यालय गोरेगाव