स्वच्छतेसाठी होणार अत्याधुनिक कचरा गाडयांचा वापर ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:23 AM2021-07-17T04:23:31+5:302021-07-17T04:23:31+5:30
गोरेगाव : मागील काळात तत्कालीन नगराध्यक्ष आशीष बारेवार यांच्या प्रयत्नाने जुलै २०१९ मध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्थानिक ...
गोरेगाव : मागील काळात तत्कालीन नगराध्यक्ष आशीष बारेवार यांच्या प्रयत्नाने जुलै २०१९ मध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या १४ वित्त आयोग अंतर्गत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अंतर्गत नगर पंचायतला कचरा संकलनासाठी हॉपर टिप्पर खरेदीला परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार, बुधवारी (दि.१४) नगर पंचायतला ३ हॉपर टिप्पर प्राप्त झाले आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे घनकचरा व्यवस्थापनाकरीता शासनाकडून प्राप्त होणाऱ्या १४ व १५ व्या वित्त आयोग निधीत मागील वर्षाच्या तुलनेत कमी निधी मिळाल्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यात आली होती. त्यामुळे प्रत्येक वाॅर्डात कचराकुंडीत कचरा जास्त प्रमाणात साठत आहे. त्याची उचल करण्याकरिता ट्रॅक्टरच्या मदतीने सफाई कामगारांना वेळ लागत होता. तसेच हात रिक्षाने शहरापासून डम्पिंग ग्राउंडपर्यंत कचरा पोहोचविन्यात खूप वेळ वाया जात असून खूप कमी प्रमाणात कचरा डम्पिंग ग्राउंड पर्यंत पोहोचत होता. त्यामुळे कचरा संकलनासाठी नगर पंचायतला हॉपर टिप्पर खरेदीला परवानगी मिळाली होती. या गाड्यांची क्षमता २.५ क्युबिक मीटर कचरा एकावेळेस नेण्याची असून ओला व सुका कचरा वेगवेगळ्या पद्धतीने ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच गाडीतील कचरा बाहेर टाकण्यासाठी हायड्रोलिक सिस्टम लावण्यात आले आहे. त्यामुळे कचऱ्याला लवकर डम्पिंग ग्राउंड पर्यंत नेत अनलोड करण्यास मदत होणार आहे. या गाड्यांमध्ये जीपीएस सिस्टिम लावण्यात आले असून कचरा गाडी प्रत्येक प्रभागात कोणत्या वेळेत फिरली व कचरा गोळा केला याची माहिती ऑनलाइन पद्धतीने नगरपंचायतला प्राप्त होईल. तसेच लोकांची तक्रार कमी होईल लवकरच या अत्याधुनिक गाड्यांची सेवा गोरेगावच्या नागरिकांना मिळेल.
----------------------------------
७५० घरांसाठी एक गाडी
या गाडीमध्ये स्पिकरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यामुळे कचरागाडी आपल्या घरासमोर आल्याची सूचनापूर्वक जाणीव शहरातील लोकांना होण्यास व घनकचऱ्याचे योग्यरीत्या व्यवस्थापन होण्यास मदत मिळेल. शहरातील ७५० घरांवर एक कचरा गाडी अशी व्यवस्था नगरपंचायतव्दारे करण्यात येणार आहे. यासाठी शहरात ३ विभाग पाडून ३ गाड्यांना लवकरच सेवेमध्ये नगर प्रशासन आणणार आहे. या अत्याधुनिक गाड्यांमुळे शहरातील स्वच्छता राखण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाला खूप मोठी मदत होणार आहे.
------------------------------
घरातील कचरा इतरत्र फेकू नका
शहर कचरामुक्त ठेवण्यासाठी शहरवासीयांनी घरातील कचरा घरातच साठवून कचरागाडी आल्यावर त्यामध्ये टाकायचा आहे. यासाठीच या गाड्यांची व्यवस्था नगर पंचायतने केली आहे. असे झाल्यास शहरातील कचरा नाहीसा होणार व शहर स्वच्छ तसेच रोगराईमुक्त होणार आहे. करिता नागरिकांनी कचरा इतरत्र न फेकता कचरागाडीतच टाकावा असे नगरपंचायतचे माजी अध्यक्ष बारेवार, माजी उपाध्यक्ष सुरेश राहंगडाले, हिरालाल राहंगडाले, प्रशासक अजय नष्टे, मुख्याधिकारी हर्षला राणे, स्वच्छता विभाग प्रमुख आशुतोष कांबले यांच्यासह सर्व माजी सदस्य व कर्मचाऱ्यांनी कळविले आहे.