पेरणी खोळंबली, शेतकरी चिंतातुर

By admin | Published: June 25, 2016 01:40 AM2016-06-25T01:40:26+5:302016-06-25T01:40:26+5:30

जून महिना संपण्याच्या मार्गावर असताना तालुक्यात पावसाने दमदार हजेरी न लावल्याने सर्वत्र चिंतेचे सावट पसरलेले आहे.

Sowing drop, farmers worry | पेरणी खोळंबली, शेतकरी चिंतातुर

पेरणी खोळंबली, शेतकरी चिंतातुर

Next

मागील वर्षाच्या तुलनेत अपुरा पाऊस : फक्त ३० टक्के भाताची पेरणी
अमरचंद ठवरे अर्जुनी मोरगाव
जून महिना संपण्याच्या मार्गावर असताना तालुक्यात पावसाने दमदार हजेरी न लावल्याने सर्वत्र चिंतेचे सावट पसरलेले आहे. उन्हाची तीव्र दाहकता आजही कायम असल्याने शेतकामात पाहिजे त्याप्रमाणात वेग आलेला दिसत नाही. पाऊस पडण्याचे तिन्ही नक्षत्र कोरडेच गेल्याने भात पिकाच्या नर्सरी (रोपवाटिका) लावण्याचे काम मंदावले आहे.
ऐन पेरणी हंगामात पावसाने हुलकावनी दिल्याने तालुक्यातील शेतकरी बांधव चिंताग्रस्त होऊन निराशेचे जीवन व्यतीत करताना दिसत आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी मात्र अत्यल्प पाऊस पडल्याची नोंद आजपर्यंत करण्यात आल्याने भाताच्या पेरणी करण्याच्या प्रक्रियेला वेग आलेला दिसत नाही. निसर्गाच्या अवकृपेमुळे मात्र शेतकरी पूर्णत: खचून जाऊन मोठ्या धर्मसंकटात पडलेला दिसत आहे.
तालुक्यात यावर्षी खरीप हंगामासाठी भात पिकाखालील क्षेत्र २२ हजार ८७० हेक्टर, तूर, मूग, उडीद या कडधान्यासाठी ७९० हेक्टर, तीळ गळीत धान्यासाठी १६० हेक्टर, इतर पिकांसाठी १० हेक्टर असे एकूण २३ हजार ८३० हेक्टर शेतजमीन निर्धारित करण्यात आली आहे. तालुक्यात २२ जूनपर्यंत ६८७ हेक्टरमध्ये भातपिकासाठी नर्सरी (पऱ्हे) लावून फक्त ३० टक्के पेरणी झाल्याचे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.
२२ जूनपर्यंत ३४.६० मि.मी. पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी याच दिवसापर्यंत १९८.९० मि.मी. पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली होती. पावसाचा हंगाम सुरू झाल्यापासून रोहिणी, मृग, आद्रा पाऊस पडणारे तिन्ही नक्षत्र कोरडेच गेल्याने तालुक्यामध्ये सध्या चिंतामय परिस्थिती निर्माण झालेली दिसत आहे. ज्यांच्याकडे ओलिताची सोय, हातचे पाणी आहे, अशा शेतकरी बांधवांनी मोठ्या लगबगीने भाताचे पऱ्हे टाकले.
तालुक्यात तलाव, बोळ्यांची संख्या बऱ्याप्रमाणात असली तरी त्यात पाण्याचा ठणठणाट असून कोरडे तलाव दृष्टिपथास दिसतात. जास्तीत जास्त शेती निसर्गाच्या लहरीपणावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण होऊन भयावह परिस्थितीची चाहुल आताच लागलेली दिसत आहे.
सध्या बाजारात विविध कंपन्यांचे महागडे भात पिकाचे बियाणे आले आहेत. काही शेतकऱ्यांनी जुगार खेळलो म्हणून वारलीचे पऱ्हे टाकले. आज नाही उद्या वरुण राजा बरसणार या भोळ्याभाबड्या आशेने पेरणी केली. जमिनीमध्ये पाहिजे तसा ओलावा निर्माण न झाल्याने पेरलेल्या बियाण्यांची पूर्णत: उगवन होईल याची शाश्वती नाही, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली. येणारा प्रत्येक वर्ष हा शेतकऱ्यांना शाप म्हणून येत असल्याने वारंवार कर्जाच्या जोखडात बांधला गेल्याची परिस्थिती निर्माण झाल्याच्या प्रकाराने शेतकरी पूर्णत: खचून गेले आहेत. बारमाही शेतात राबणारा बळीराजा कर्जाच्या ओझ्यातून बाहेर पडण्याचे भाग्य त्याच्या नशिबात आलेले दिसत नाही.
सातत्याने पावसाने हुलकावणी देण्याचा मनसुबा केल्याने शेतकरी वर्गात सध्यातरी नैराश्येचे वातावरण पसरलेले दिसत आहे. शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येणार कोण? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडत आहे. हवामानाचा अंदाज, सल्ला आज शेतकऱ्यांच्या हिताचे दिसत नाही. पऱ्हे टाकणीचा हंगाम संपण्याच्या मार्गावर येवूनसुद्धा पावसाने हजेरी लावली नसल्याने आर्थिक संकट आले आहे.

श्री पद्धतीने भाताची लागवड
अन्न सुरक्षा अभियानांतर्गत चुटीया, धाबेटेकडी येथील ५०० शेतकऱ्यांना श्री पद्धतीने भाताची लागवड करण्यासाठी एमएमटी धानाचे वाटप करण्यात आले. संकरीत पीक पद्धती प्रात्यक्षिकासाठी ईसापूर, गंधारी गावाची निवड करण्यात आली. सिरोली, खांबी, खोकरी, सावरटोला, इंझोरी, खडकी या गावातील तिनशे शेतकऱ्यांची प्रतिशेतकरी ०.४० आर. प्रमाणे श्री पद्धतीने भाताची लागवड करण्यासाठी निवड केली आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने भात पिकाची लागवड करावी, असे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

कृषी विभागाचा सल्ला
सध्या पावसाने हुलकावणी दिली आहे. तिन्ही नक्षत्र कोरडेच गेल्याने भयावह परिस्थिती दिसत आहे. शेतकरी बांधवांनी पाऊस आल्यानंतर जमिनीत ओलवा परिपूर्ण झाल्याशिवाय पऱ्हे टाकू नये. तसेच बांधावरील तुरी, तिळ पिकांची लागवड करु नये, असा सल्ला तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी दिला.

Web Title: Sowing drop, farmers worry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.