विभागीय जात वैधता समितीकडून बोळवण
By admin | Published: July 26, 2014 02:19 AM2014-07-26T02:19:59+5:302014-07-26T02:19:59+5:30
अभियांत्रिकी, वैद्यकीय शाखेसारख्या महत्वाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश
जीव टांगणीला : विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले
सोनपुरी : अभियांत्रिकी, वैद्यकीय शाखेसारख्या महत्वाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र गरजेचे आहे. परंतू विभागीय जात वैधता पडताळणी समितीच्या अडेलटट्टूपणामुळे हजारो विद्यार्थ्यांची बोळवण केली जात आहे. तब्बल एक वर्षापासून त्यांना हे वैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे प्रवेश अडून पडले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यात अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठीचे फॉर्म भरुन ते विभागीय जात वैधता प्रमाणपत्र समितीकडे नागपूरला पाठविले जाते. परंतू वर्ष लोटले तरी प्रमाणपत्र मिळाले नाही. संबधित महाविद्यालयाचे क्लर्क याबाबतची माहिती घेण्यासाठी विभागीय जात वैधता पडताळणी समितीच्या नागपूर येथील कार्यालयात गेले असता त्यांना तुमचे जात प्रमाणपत्र बरोबर नाही असे सांगत ते फॉर्म परत करण्यात आले. त्या फॉर्मसोबत जोडलेले विद्यार्थ्याचे प्रमाणपत्र बरोबर नाही. जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमीलिअर प्रमाणपत्र सोबत नसावे, असे सांगून ते फॉर्म परत देण्यात आले.
वास्तविक तहसील कार्यालयमार्फत उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून मिळणारे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमीलीयर प्रमाणपत्र सोबतच दिले जातात. आजपर्यंत जितके जात वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे, ते या प्रमाणपत्राच्या आधारेच मिळाले आहे. वास्तविक जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेयर सोबतच बनविले जातात. असे असताना आताच विभागीय समितीच्या अधिकाऱ्यांनी हा नवीन नियम कसा काय लावला? असा प्रश्न तमाम विद्यार्थ्यांसह महाविद्यालयांना पडला आहे.महाविद्यालयाचे प्रतिनिधी किंवा स्वत: विद्यार्थी जेव्हा विभागीय जात वैधता प्रमाणपत्रासाठी नागपूरला जातात तेव्हाच त्यांना अर्जातील त्रुटीपत्र व टिपणी लिहून दिली जाते. त्यामुळे त्यांना आल्या पावली मनस्ताप सहन करीत परत यावे लागत आहे.
या प्रकाराने हजारो विद्यार्थ्यांचे पुढील अभ्यासक्रमाचे प्रवेश रखडले आहेत. त्याच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत नेमके काय नियम आहेत हे स्पष्ट करून रखडलेली जात वैधता प्रमाणपत्राची प्रक्रिया सुरळीत सुरू करावी अशी मागणी केली जात आहे. (वार्ताहर)