नगर परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 09:09 PM2018-01-14T21:09:37+5:302018-01-14T21:10:14+5:30
नगर परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा सोमवारी (दि.१५) दुपारी ३ वाजता नगर परिषद सभागृहात बोलाविण्यात आली आहे. नियमानुसार पाच विषयांवर ही सभा बोलाविण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नगर परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा सोमवारी (दि.१५) दुपारी ३ वाजता नगर परिषद सभागृहात बोलाविण्यात आली आहे. नियमानुसार पाच विषयांवर ही सभा बोलाविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, २७ आॅक्टोबर नंतर ही दुसरी विशेष सर्वसाधारण सभा अध्यक्षांनी बोलाविली आहे.
विरोधी पक्षाने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरून न्यायालयाने नगर परिषदेच्या सभांवर स्थगिती लावली आहे. परिणामी नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी १० मे रोजी बोलाविलेल्या आमसभेनंतर २७ आॅक्टोबर रोजी विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली. त्यानंतर आता सोमवारी (दि.१५) विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली आहे.
या सभेत नगर परिषदेतील विविध विभागांमार्फत बोलाविण्यात आलेल्या कमी दराच्या निविदांना मंजुरी, घनकचरा व्यवस्थापनांतर्गत डंपींग ग्राऊंडकरिता जागा खरेदी करणे, नगर परिषद क्षेत्रात रहदारी व बाजार परिसरातील नेहरू चौक परिसर उड्डाणपुला खाली, जुना बसस्थानक परिसर, दिल्ली हॉटेल ते विकास मेडीकल पर्यंतची गल्ली व सुभाष शाळेच्या मैदानात पे पार्कींग तयार करणे, येत्या वर्षाकरिता मुदतवाढ मिळणे तसेच अग्निशमन बळकटीकरण अंतर्गत जिल्हा नियोजन समितीमार्फत प्राप्त निधीतून अग्निशमन वाहन खरेदी करणे हे विषय मांडले जाणार आहेत.