वाहतूक कोंडीवर ‘स्पेशल प्लॅनिंग’
By admin | Published: October 16, 2016 12:25 AM2016-10-16T00:25:38+5:302016-10-16T00:25:38+5:30
व्यापारी शहर असणाऱ्या गोंदियात दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात आता गर्दी वाढत आहे.
मुख्य चौकांत बॅरीकेट्स : चारचाकी वाहनांना बाजारात प्रवेशबंदी
गोंदिया : व्यापारी शहर असणाऱ्या गोंदियात दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात आता गर्दी वाढत आहे. त्यामुळे आधीच अरूंद असलेल्या रस्त्यांवव वाहतुकीची समस्या उद्भवत आहे. यावर तोडगा म्हणून वाहतूक नियंत्रण शाखेने ‘स्पेशल प्लॅनिंग’ केले आहे. यात मुख्य चौकांत बॅरीकेट्स लावले जाणार आहे. मुख्य म्हणजे चारचाकी वाहनांना बाजारात प्रवेशबंदी केली जाणार आहे. सोमवारपासून (दि.१७) यावर अंमलबजावणी केली जाणार आहे.
शहरातील रस्ते अरूंद असून वाहनांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे. अशात शहरातील बाजार भागात मात्र वाहतुकीच्या कोंडीची समस्या जास्तच उद्भवते. विशेष म्हणजे दिवाळीच्या खरेदीसाठी शहरच काय तर लगतच्या परिसरातील नागरिकही येथील बाजारात येतात. परिणामी बाजारात पाय ठेवायला जागा उरत नाही. अशात वाहकुतीची समस्या निर्माण होते व याचा त्रास नागरिकांना सोसावा लागतो. त्यात एखादी चारचाकी शिरल्यास पूर्ण वाहतूक व्यवस्थाच विस्कटत असल्याचे दरवर्षीचे चित्र आहे.
दरवर्षी दिवाळीच्या तोंडावर बाजारात बॅरीगेट्स लावून वाहतुकीची व्यवस्था केली जाते. यात कित्येक चारचाकी वाहनधारक बॅरीगेट्स हटवून आपले वाहन बाजारात शिरवतात. परिणामी बाजारातील वाहतूक विस्कटते व दुचाकी तसेच पायदळ नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. मात्र दिवाळीच्या या गर्दीसाठी यंदा वाहतूक नियंत्रण शाखेने ‘विशेष प्लॅनींग’ केले असून वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)
बॅरीकेट्सचा करणार वापर
दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात जास्त वाहतुकीची कोंडी होत असल्याने चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी करून दुचाकींनाच प्रवेश देण्यासाठी शाखेकडून खोजा मस्जीद चौक, आमदार गोपालदास अग्रवाल यांचे निवासस्थान, दुर्गा चौक व श्री टॉकीज चौक या चार जागांवर बॅरीगेट्स लावले जाणार आहेत. यासह प्रत्येक बॅरीगेट्सजवळ दोन कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावली जाणार आहे. तर गोरेलाला चौकातही दोन कर्मचारी लावले जातील. तसेच बाजारातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी चार कर्मचारी सतत पायदळ पेट्रोलींग करतील.
चारचाकी वाहनांसाठी पार्र्किं ग
चारचाकी वाहनांना बाजारात प्रवेशबंदी करण्यात आली असून या वाहनांना पोलीस ठाण्याच्या मागे, पोलीस ठाणे आवार, स्टेडीयम परिसर व उड्डाणपूल परिसरात पार्कींगची व्यवस्था केली जाणार आहे. सकाळी ९ ते रात्री १० वाजता पर्यंत चारचाकी वाहनांना बाजारात प्रवेशबंदी राहणार आहे. त्यामुळे चारचाकीतून आलेल्या नागरिकांना आपली वाहने निर्धारीत जागांवरच पार्क करून बाजारात खरेदीसाठी जावे लागेल. चारचाकी वाहनांची ही पार्कींग व्यवस्था बघण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी तेथे तैनात राहतील.
आता जनजागृतीसह दंड
४चारचाकी वाहनांचा हैदोस थांबविण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेने गणेशोत्सवापासून आतापर्यंत चालानवर भर न देता फक्त जनजागृती करून बाजारातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. आता मात्र जागृतीसह दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यांतर्गत चारचाकी वाहनाने बाजारात प्रवेश केल्यास पहिल्यांदा त्याला समजावून त्या वाहनाची नोंद ठेवली जाणार आहे. मात्र त्यानंतरही नियमांचे उल्लंघन झाल्यास नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.