बिरसी प्रकल्पग्रस्तांसाठी २१ कोटींचे विशेष पुनर्वसन पॅकेज
By admin | Published: June 28, 2017 01:30 AM2017-06-28T01:30:57+5:302017-06-28T01:30:57+5:30
बिरसी विमानतळाचा विस्तार व नविनीकरण काँग्रेस सरकारच्या काळात झाले होते. मोठ्या प्रमाणात तेथील लोकांना हाकलून
विनोद अग्रवाल : प्रकल्पग्रस्तांना लॉलीपॉप दाखवित असल्याचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बिरसी विमानतळाचा विस्तार व नविनीकरण काँग्रेस सरकारच्या काळात झाले होते. मोठ्या प्रमाणात तेथील लोकांना हाकलून त्यांच्या जमिनी अधिग्रहित करून त्यांना रस्त्यावर आणण्याचे कार्य काँग्रेस सरकारने केले होते. काँग्रेस सरकारचे शेतकरीविरोधी धोरण व शेतकऱ्यांना उपाशी ठेवणाऱ्या नेत्यांनी सरकार असताना काहीच केले नाही. आज मात्र केंद्रातील भाजप सरकारने बिरसीच्या प्रकल्पग्रस्तांना दिलासा देण्यासाठी २१ कोटींचे विशेष पुनर्वसन पॅकेज दिले असता प्रकल्पग्रस्तांना लॉलीपॉप देऊन नेता खोटी वाहवाह लुटत असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी पत्रकातून केले.
बिरसी विमानतळातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांना घेऊन भाजप कार्यकर्त्यांनी खासदार नाना पटोले यांच्याशी चर्चा करून पुनर्वसन पॅकेज मिळवून देण्याची मागणी केली होती. यावर खासदार पटोले यांनी प्रकल्पग्रस्त भागाचा दौरा करून जिल्हाधिकाऱ्याना पॅकेजचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्याचे निर्देश दिले होते.
तसेच खासदार पटोले यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीमंडळाची केंद्रीय नागरिक विमानन मंत्री अशोक गजपती राजू सोबत भेट घालून त्यांच्या स्थितीशी अवगत करवून पॅकेजची मागणी केली होती. राज्य सरकारच्या माध्यमातून पाठविण्यात आलेल्या २१ कोटींच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूर केले व त्याचा लाभ प्रकल्पग्रस्तांना मिळणार आहे. शासनाची पारदर्शी भूमीका असल्याचे अग्रवाल यांनी सांगीतले.