शहरातील १० केंद्रांवर विशेष लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:28 AM2021-05-14T04:28:50+5:302021-05-14T04:28:50+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांची संख्या १ लाख ३५ हजारांच्या जवळपास आहे. त्यामुळे नागरिकांना ...
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांची संख्या १ लाख ३५ हजारांच्या जवळपास आहे. त्यामुळे नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठी प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. १५ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरातील दहा केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.
कोरोनाचा दुसरा डोस घेण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ही व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली. या केंद्रावर लसीकरणादरम्यान लसींचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक केंद्राला ६०० डोस कोविशिल्ड लसीचे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यांची नोंदणी ही लसीकरण केंद्रावर होणार आहे. लसीकरणाकरिता लसीचे प्रथम डोस घेतलेल्या नागरिकांना आधार कार्ड व प्रथम डोस घेतल्याच्या पुराव्यासह लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करता येईल. गोंदिया शहरातील ४५ वर्षांवरील नागरिकांनी कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेण्याकरिता जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन कोरोनाविषयक प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून लसीकरण करून घ्यावे, असे उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी कळविले आहे.
.........
या दहा केंद्रांवर होणार लसीकरण
गोंदिया शहरातील नगर परिषद शाळा गणेशनगर, नगर परिषद शाळा गोविंदपूर, नगर परिषद हायस्कूल रामनगर, नगर परिषद गर्ल्स हायस्कूल अग्रसेन भवनजवळ, जे. एम.पटेल शाळा अवंती चौक, मालवीय स्कूल श्रीनगर, मनोहर म्युनिसिपल हायस्कूल स्टेडियमजवळ, नगर परिषद शाळा माताटोली, नगर परिषद शाळा रेलटोली गुजराती शाळेजवळ, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र कुंभारेनगर या केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे.