निधी वेळेत खर्च करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 01:15 AM2019-01-09T01:15:23+5:302019-01-09T01:16:05+5:30
शासनाच्या लोककल्याणकारी योजना गरजू लाभार्थ्यांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवून सामान्य लोकांचा विकास व्हावा, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शासन निधी उपलब्ध करून देते. हा निधी वेळेत खर्च करून त्याची अंमलबजावणी यंत्रणांनी लोकांच्या कल्याणासाठी करण्याचे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासनाच्या लोककल्याणकारी योजना गरजू लाभार्थ्यांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवून सामान्य लोकांचा विकास व्हावा, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शासन निधी उपलब्ध करून देते. हा निधी वेळेत खर्च करून त्याची अंमलबजावणी यंत्रणांनी लोकांच्या कल्याणासाठी करण्याचे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
जिल्हा नियोजनच्या कार्यकारी समितीची आढावा बैठक सोमवारी (दि.७) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या वेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. राजा दयानिधी, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, जिल्हा नियोजन अधिकारी एम.ए.भूत व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कृषी विषयक योजना, जलयुक्त शिवार, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, ग्रामविकास, आरोग्य, शिक्षण व रस्ते आणि पाणी पुरवठा विभागाच्या योजना संबंधित यंत्रणेने प्रभाविपणे राबवून या योजनांवरील निधी वेळेत खर्च होणे आवश्यक असल्याचे बडोले यांनी सांगितले. शाळांच्या १०१ वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीच्या त्वरीत निधी देण्याचे निर्देश दिले. आरोग्य सेवा या लेखाशीर्ष अंर्तगत अनुदान वितरित झाले नाही तसेच ज्या विभागाचे अनुदान वितरित झाले नाही त्याबाबत तपासणी करून त्वरीत कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी दिल्या. महिला रु ग्णालय व ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामाचे प्रस्ताव त्वरीत सादर करण्यास करण्यास बडोले यांनी सांगितले. ग्रामीण पाणी पुरवठा, हातपंपाची दुरुस्ती, स्त्रोताचे बळकटीकरण या विषयावर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार नाही. या दृष्टीने उपाय योजना करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. नगरविकास, महसूल, पाणीपुरवठा व स्वच्छता, ग्राम विकास, शिक्षण व तंत्र शिक्षण, ग्रंथालय, नगररचना, या विभागाच्या खर्चाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. जिल्हा नियोजन अंतर्गत प्राप्त निधी खर्च होताच त्यांचे उपयोगिता प्रमाणपत्र सर्व विभागाने तात्काळ सादर करण्याचे निर्देश बडोले यांनी दिले. अंगणवाडी बांधकामाचा निधी वेळेत खर्च करण्यात यावा. जिल्ह्यातील लघु पाटबंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी लपा जि.प. यांनी प्रस्ताव पाठवावा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले. शासकीय जमिनीवरील अतिक्रमण रोखण्यासाठी संरक्षण भिंत बांधण्यासाठी निधी उपलब्ध असून विविध विभागाने यासाठी प्रस्ताव पाठविण्यात अशा सूचना या वेळी केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी विकास योजनेमध्ये कृषीपंप देण्यात येतात. या योजनेच्या शासन निर्णयात कृषीपंपासोबतच कृषी सौरपंप असा उल्लेख करून सुधारित शासन निर्णय काढण्याचे निर्देश दिले. या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना सन २०१८-१९ माहे डिसेंबर २०१८ अखेर झालेल्या खर्च व भौतिक प्रगतीचा आढावा, जिल्हा वार्षिक योजना सन २०१९-२० करिता सर्वसाधारण योजना,अनुसूचित जाती उपायोजना, आदिवासी उपयोजना व ओटीएसपी योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या आराखड्यावर चर्चा करण्यात आली.