३१ मार्चपर्यंत निधी खर्च करा- बागडे
By Admin | Published: March 2, 2016 02:18 AM2016-03-02T02:18:27+5:302016-03-02T02:18:27+5:30
शासनाकडून प्राप्त झालेला निधी मार्च २०१६ अखेर खर्च करणे अत्यावश्यक आहे. पण जिल्ह्यात कोणत्याही ग्रामपंचायतीने कामे सुरू केले नाही.
गोंदिया : शासनाकडून प्राप्त झालेला निधी मार्च २०१६ अखेर खर्च करणे अत्यावश्यक आहे. पण जिल्ह्यात कोणत्याही ग्रामपंचायतीने कामे सुरू केले नाही. त्यामुळे सदर निधी परत जाण्याची पाळी आली असून हा निधी वेळेत खर्च करा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेश डी. बागडे यांनी केले.
ग्रामविकास मंत्रालयाने चौदाव्या केंद्रीय वित्त आयोगाचे परिपत्रक काढले. त्यात कामे करण्याबाबत सर्व मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. २१ डिसेंबर २०१५ ला निघालेल्या या परिपत्रकानुसार बागडे यांनी हे आवाहन केले. जिल्ह्यातील पूर्ण ग्रामपांयतींचे खाते क्रमांक वित्त विभाग जि.प. गोंदियाला प्राप्त झाले. ७ जानेवारी २०१६ ला वित्त विभागाने २८ कोटी रूपये बँक आॅफ इंडियाला पाठविले. बँक व्यवस्थापक आर.एस. रिगनगावकर यांनी सांगितल्याप्रमाणे खाते क्रमांक बरोबर नसल्यामुळे वेळेवर निधी जमा होऊ शकला नाही. पुन्हा खाते क्रमांक मागवून २५ फेब्रुवारी २०१६ ला जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना निधी त्यांच्या खात्यावर जमा करून दिला. प्रत्येक ग्रामपंचायतींनी कामांचे नियोजन केले. त्या नियोजनाची तालुका समितीकडून मंजुरी घेऊन ग्रामसभेमार्फत मंजूर करून घेतले. कामाच्या मंजुरीप्रमाणे प्रत्येक कामाचे इस्टीमेट तयार करण्यात येत आहेत. परंतु त्या इस्टीमेटवर गटविकास अधिकारी स्वाक्षरीच करीत नाही.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी बागडे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, गटविकास अधिकारी तांत्रिक अधिकारी नसल्यामुळे स्वाक्षरीची आवश्यकता नाही. शाखा अयिभंता व उपमुख्य कार्यकारी अभियंता यांची स्वाक्षरी घेऊन कामे करावी. कोणत्याही परस्थितीत निधी परत जाणार नाही. शासनाने ठरवून दिलेल्या नियोजित वेळेतच निधी खर्च व्हायला पाहीजे. बीडीओ यांना पत्र पाठवून नियोजित तारखेपर्यंत कामे पार पाडण्यास सांगितले असून तसे न झाल्यास सरपंच व सचिव जवाबदार ठरतील, असे त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)