योजना शेवटपर्यंत पोहोचवू
By admin | Published: January 20, 2015 12:07 AM2015-01-20T00:07:43+5:302015-01-20T00:07:43+5:30
माझ्या आदिवासी समाजाने माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे, ती पूर्ण करण्याकरिता सरकारच्या योजना आदिवासी समाजातील अंतिम व्यक्तीपर्यंत पोहचविण्यास मी कटीबद्ध आहे,
देवरी : माझ्या आदिवासी समाजाने माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे, ती पूर्ण करण्याकरिता सरकारच्या योजना आदिवासी समाजातील अंतिम व्यक्तीपर्यंत पोहचविण्यास मी कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
गोंडवाना सेवा समितीद्वारे देवरी येथील शिव मंदिरच्या पटांगणावर आदिवासी मेळावा व सत्कार समारंभ पार पडले. यावेळी ते मार्गदर्शन करीत होते.
अध्यक्षस्थानी आ. संजय पुराम होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. नामदेव उसेंडी, माजी आ. रामरतन राऊत, महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, जि.प. सदस्य मीना राऊत, विरेंद्र अंजनकर, गीलानी, उपविभागीय अधिकारी सोनवाने, तहसीलदार उईके, फुलसुंगे उपस्थित होते.
ना. आत्राम पुढे म्हणाले की, सरकारचे दुसरे सर्वात मोठे बजेट हे आदिवासी विभागाचे असते. परंतु आदिवासीकरिता शासनाच्या कल्याणकारी योजना प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे लोकांपर्यंत पोहोचतच नाही. ही प्रणाली लवकरच बदलविण्यात येईल. समाजाच्या विकासाकरिता युवकांना, विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून आ. संजय पुराम यांनी धनगर समाजाच्या आरक्षणावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, जर आमच्या सरकारने धनगर समाजाला आदिवासी समाजात समाविष्ट केले तर सर्वप्रथम आमदारकीच्या राजीनामा मी देणार. परंतु ही लढाई आम्हा सर्वांना मिळून लढायची आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी आ. रामरतन राऊत, नामदेव उसेंडी, सोयाम यांनीही उपस्थिताना मार्गदर्शन केले. पाहुण्यांचे स्वागत गोंडी गीत व नृत्याने करण्यात आले. गोंडवाना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शाल व श्रीफळ देवून ना. अम्ब्रीशराव आत्राम व आ. संजय पुराम यांचा सत्कार केला. प्रास्ताविक देवकीशन दुर्गे, संचालन भरत मडावी यांनी तर आभार केशव मसराम यांनी मानले. यावेळी हजारोच्या संख्येत समाजबांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)