शिक्षणावरील खर्च ही भविष्याची गुंतवणूक - सचिन पायलट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2020 07:09 PM2020-02-09T19:09:03+5:302020-02-09T19:09:43+5:30
शिक्षणावर होणार खर्च हा केवळ खर्च नसून ती भविष्यातील गुंतवणूक होय. शिक्षणावर होणा-या खर्चातूनच भावी सुसंस्कृत पिढी आणि उद्याचे भविष्य घडत असते.
गोंदिया : शिक्षण हे असे वरदान आहे जे कधीच कुणी आपल्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. ते नेहमीच आपल्यासोबत असते.दरवर्षी अर्थसंकल्पात ऐवढा खर्च केला जाईल, अशी तरतूद केली जाते. मात्र शिक्षणावर होणार खर्च हा केवळ खर्च नसून ती भविष्यातील गुंतवणूक होय. शिक्षणावर होणा-या खर्चातूनच भावी सुसंस्कृत पिढी आणि उद्याचे भविष्य घडत असते. त्यामुळे शिक्षणावर होणाºया खर्चाला केवळ खर्च म्हणून पाहू नये असे प्रतिपादन राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी येथे केले.
गोंदिया शिक्षण संस्थेतर्फे स्व.मनोहरभाई पटेल यांच्या ११४ व्या जयंती कार्यक्रम रविवारी (दि.९) स्थानिक धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या प्रागंणावर आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. प्रफुल्ल पटेल हे होते. या वेळी प्रामुख्याने, महाराष्टÑ विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, महाराष्टÑाचे गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सिने कलावंत सुनील शेट्टी, नगराध्यक्ष अशोक इंगळे, गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा वर्षा पटेल, आ. विनोद अग्रवाल, मनोहर चंद्रिकापूरे, सहषराम कोरोटे, राजू कारेमोरे, प्रकाश गजभिये, माजी खा. मधूकर कुकडे, खुशाल बोपचे, माजी आ.सेवक वाघाये, गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव माजी आ.राजेंद्र जैन प्रामुख्याने उपस्थित होते. सचिन पायलट म्हणाले, स्व. मनोहरभाई पटेल यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्यात शिक्षणाचे विस्तारलेले जाळे त्यांचे पूत्र खा.प्रफुल्ल पटेल हे तेवढ्याच जबाबदारी पुढे वाढवित आहेत. गोंदिया शिक्षण संस्थेव्दारा संचालित शाळा आणि महाविद्यालय पाहून आपण खरोखरच भारावून गेलो.
गोंदिया जिल्ह्यात ऐवढ्या दर्जेदार शिक्षण संस्था असतील याची कल्पनाच आपण केली नव्हती. केवळ शाळा आणि महाविद्यालयाची इमारत चांगली राहून काहीच होत नाही तर संस्थेत कार्यरत कर्मचारी समर्पणाची भावना घेऊन काम करतात त्यावरुन खरी गुणवत्ता दिसून येते. नेमके हेच चित्र येथे आल्यानंतर पाहयला मिळाले. देशात साधन संपत्तीची कमतरता नसून केवळ विकासासाठी इच्छा शक्तीचा अभाव आहे. राजकारणात विचारधारेचा विरोध समजू शकतो मात्र व्यक्तीचा विरोध हे आपण समजू शकत नाही अशी टिका सुध्दा त्यांनी यावेळी केली.
सर्वांना सोबत घेऊन विकासाचा रथ पुढे नेऊ -प्रफुल्ल पटेल
गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी पक्ष आणि मनभेद बाजुला ठेऊन विकासाचा रथ पुढे नेऊ.राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार असून पुढील पाच वर्षात निश्चितच शिक्षण, आरोग्य, सिंचन या क्षेत्रात कामे केली जातील. जिल्ह्यात तंत्रशिक्षणाची दर्जेदार सुविधा निर्माण करुन त्यामाध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण सर्वांच्या सहकार्याने निर्माण करु अशी ग्वाही खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
मुंगेरीलालचे स्वप्न खरे होणार नाही-अनिल देशमुख
महाराष्टÑात तीन वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. विचारधारा जरी वेगळ्या असल्यातरी राज्याच्या विकासासाठी सर्वांचा दृष्टीकोन मात्र एकसारखाच आहे. मात्र हे विरोधकांना पचत नसल्याने ते हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही असे स्वप्न ते पाहत आहे. मात्र मुंगेरीलालचे हे स्वप्न कधी खरे होणार नाही महाविकास आघाडी सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करेल असा टोला लगावित गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधकांचा समाचार घेतला.