प्रफुल्ल पटेलांच्या जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये फूट : २८ जुलैला बोलावला मेळावा
By अंकुश गुंडावार | Published: July 18, 2023 07:41 PM2023-07-18T19:41:49+5:302023-07-18T19:41:57+5:30
जिल्ह्यात वीरेंद्र जयस्वाल यांनी उचलला शरद पवार गटाचा झेंडा
गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वातील गटाने २ जुलै रोजी राज्यातील शिंदे-फडणवीस गटाला पाठिंबा देत त्यांच्यासह एकूण नऊजणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खा. शरद पवार व ना. अजित पवार असे दोन गट पडले आहे, तर खा. प्रफुल्ल पटेल हे अजित पवार यांच्यासह असल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी, सदस्यांनी खा. प्रफुल्ल पटेल जिथे तिथे आम्ही अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे जिल्ह्यात खा. शरद पवार यांच्या गटाचा झेंडा कोण उचलणार याकडे लक्ष लागले. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव पदावर विराजमान असलेले वीरेंद्र जायस्वाल यांनी खा. शरद पवार यांच्या गटाचा झेंडा हाती घेतल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे.
मागील दोन दिवसांपासून अजित पवार गटाकडून दोन्ही गटांचे एकत्रीकरणाने मनोमिलनचे प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या घडामोडींकडे लागले आहे. अशातच खा. प्रफुल्ल पटेलांच्या गृह जिल्ह्यात खा. शरद पवार यांच्या गटाचा मेळावा होणार, असे निश्चित करण्यात आले. त्यामुळे आता प्रफुल्ल पटेल यांच्या गोंदिया जिल्ह्यातपण राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगल्याचे चित्र निर्माण झाले आहे. खा. शरद पवार गटाचे जिल्ह्यात नेतृत्व करीत वीरेंद्र जायस्वाल यांनी शरद पवार गटाच्या मेळाव्याचे आयोजन २८ जुलैला केले आहे. या मेळाव्याला स्वत: खा. शरद पवार, कार्यकारी अध्यक्ष खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख यांची उपस्थिती राहणार असून, याच मेळाव्यात जिल्हा कार्यकारिणीची घोषणा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव वीरेंद्र जायसवाल यांनी दिली.
मेळाव्याच्या आयोजनाचे लागले फलक
वीरेंद्र जायस्वाल यांनी २८ जुलैला गोंदिया येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. यासंबंधीचे फलकसुद्धा शहरात लागले आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे जिल्ह्यातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.