१८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:30 AM2021-05-12T04:30:14+5:302021-05-12T04:30:14+5:30
बोडगावदेवी : कोरोना महामारीचे संकट टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात ६५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाचा डोस ...
बोडगावदेवी : कोरोना महामारीचे संकट टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात ६५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाचा डोस देण्यात आला. ग्रामीण भागात काही ठिकाणी आजही पाहिजे त्या प्रमाणात लसीकरणाला प्रतिसाद मिळताना दिसून येत नाही. १८ ते ४४ वयोगटातील युवकांसह नागरिकांना लस देण्याचा शुभारंभ मंगळवारी (दि.११) प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना येथे झाला. पहिल्या दिवशी परिसरातील युवा वर्गाने स्वयंस्फूर्तीने लसीकरण घेण्यासाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याचे चित्र होते.
लसीकरणाच्या शुभारंभाप्रसंगी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसीलदार विनोद मेश्राम यांनी भेट देऊन प्रतिबंधात्मक लसीविषयी उपस्थितांना माहिती दिली. आरोग्य केंद्राविषयी माहिती अवगत केली. तालुक्यातील १८ वर्षे वयोगटातील युवक, तसेच ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करून देण्यात आली. तालुक्यातील आरोग्य विभागाच्या वतीने आजपासून ग्रामीण रुग्णालय, आरोग्यवर्धिनी केंद्रात लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. १८ ते ४४ वयोगटातील जनतेने एक दिवस अगोदर नोंदणी करून आपले स्थळ व वेळ निश्चित करावे, असे तालुका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले होते. कोरोना महामारीला हद्दपार करण्यासाठी प्रतिबंधात्मक कोरोना लस आवश्यक आहे. लस घेतल्यामुळे कोणताही विपरीत परिणाम होत नाही. त्रास व शारीरिक इजा होत नाही. भ्रामक अफवांना बळी न पडता सर्वांनी लस घेणे आवश्यक आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी आपल्या नावाची नोंदणी करून लसीकरणासाठी न डगमगता पुढे येण्याचे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. मंगळवारी लसीकरणाचा शुभारंभ होणार म्हणून परिसरातील युवा वर्गाने चान्ना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
......
१०० डोस दिले उपलब्ध करून
प्राथमिक आरोग्य केंद्राला शंभर डोस उपलब्ध करून देण्यात आले. युवा वर्गाच्या वाढत्या प्रतिसादाने प्रारंभी आरोग्य केंद्रात गर्दी वाढली. शुभारंभप्रसंगी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसीलदार विनोद मेश्राम उपस्थित होते. उपस्थितांशी त्यांनी हितगुज साधले. प्रतिबंधात्मक लस सर्वांच्या हितासाठी आहे. जीवनावश्यक ठरणार, प्रतिकार शक्ती वाढणार, कोरोना हद्दपार होणार, असे सांगून त्यांना प्रवृत्त केले. कोव्हॅक्सिन लस यावेळी देण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुलकर्णी, डॉ. कुंदन कुलसुंगे यांच्यासह आरोग्य पथकाने प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी सहकार्य केले.