जिल्ह्यात वीकेंड लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:28 AM2021-04-11T04:28:33+5:302021-04-11T04:28:33+5:30
गोंदिया : ब्रेक द चेन अंतर्गत शासनाने शनिवार आणि रविवारी विकेंट लॉकडाऊन घोषित केला आहे. या लॉकडाऊनला जिल्हावासीयांचा उत्स्फूर्त ...
गोंदिया : ब्रेक द चेन अंतर्गत शासनाने शनिवार आणि रविवारी विकेंट लॉकडाऊन घोषित केला आहे. या लॉकडाऊनला जिल्हावासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मेडिकल व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने कडकडीत बंद होती. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर सकाळपासूनच शुकशुकाट कायम होता. राज्यासह जिल्ह्यात सुध्दा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे याला प्रतिबंध लावण्यासाठी शासनाने ५ एप्रिलपासून नवीन निर्बंध लागू केले आहे. तसेच राज्यात शनिवार आणि रविवारी वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे. वीकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणी शनिवार(दि.१०) पासून करण्यात आली. शासनाने लागू केलेल्या नवीन निर्बंधांना व्यापारी व नागरिकांनी विरोध केला आहे. त्यामुळे वीकेंड लॉकडाऊनला प्रतिसाद मिळतो अथवा नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शनिवारी शहरातील मेडिकल व जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता सर्वच दुकाने बंद होती. तर शहरातील रस्त्यांवर सुध्दा दररोजच्या पेक्षा गर्दी कमी दिसून आली. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण वाढत असल्याने वीकेंड लॉकडाऊनला ग्रामीण भागात सुध्दा चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे उल्लघंन केल्याप्रकरणी शनिवारी एकही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. दरम्यान शहरातील रस्त्यांवर काही प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
........
पोलिसांनी काढला फ्लॅगमार्च
शहरात वीकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी पोलिसांनी शहरात फ्लॅगमार्च काढला. यावेळी उपविभागीय अधिकारी वंदना संवरगपते, न.प.मुख्याधिकारी करण चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्यासह अधिकारी या फ्लॅगमार्चमध्ये सहभागी झाले होते.