गावात कोरोना निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:29 AM2021-04-27T04:29:37+5:302021-04-27T04:29:37+5:30
बाराभाटी : शहराच्या तुलनेने गावागावातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिसरातील बऱ्याच गावात कोरोनाबाधित आढळत आहेत. वातावरणातील बदलामुळे सर्दी ताप ...
बाराभाटी : शहराच्या तुलनेने गावागावातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिसरातील बऱ्याच गावात कोरोनाबाधित आढळत आहेत. वातावरणातील बदलामुळे सर्दी ताप व खोकला आदी रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. परिणामी कोेरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतसुद्धा वाढ होत आहे. याला प्रतिबंध लावण्यासाठी गावात जंतुनाशक फवारणी करण्याची मागणी केली जात आहे.
सर्व ठिकाणी खेड्यापाड्यात कोरोनाचा वाढता कहर पाहून अनेक नागरिक थक्क झाले आहे. अनेक ठिकाणी औषधांचा तुटवडा आहे. अनेक वेळा साधनाअभावी कोरोनाची तपासणी होत नसल्याचे चित्र आहे. ऑक्सिजन व रेमडेसिवर इंजेक्शन मिळणे कठीण झाले होते. अशा गोष्टी जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनाला कळत नसाव्या काय? गावातील कोरोना कमी झाला नाही तर कोरोना महामारीला आणखी वेग येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात व्यापक स्वरुपात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची मागणी केली जात आहे.
....
प्रत्येक गावात जंतुनाशक फवारणीची गरज आहे. तहसील कार्यालय व पंचायत समिती यांनी फवारणी करावी, पाणी निर्जंतुक करावे, म्हणजे कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही. याासाठी स्थानिक ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा.
- मनोहर चंद्रिकापुरे, आमदार