भाताची रोवणी पट्टा पद्धतीने करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 11:56 PM2018-07-17T23:56:22+5:302018-07-17T23:57:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : तालुक्यात सर्वत्र भात रोवणीचा हंगाम सुरु झाला आहे. मागील वर्षीचा हंगाम पाहता धान पिकावर तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आला होता. सलगच्या तालुक्यात गादमाशीचा प्रादुर्भाव जाणवला होता. या बाबी विचारात घेऊन यंदाच्या खरीप हंगामात धानपिकांची तांत्रिक पद्धतीने काळजी घेतल्यास तसेच रोवणी पद्धतीत बदल करुन पट्टा पद्धतीचा अवलंब शेतकऱ्यांना फायदेशीर असल्याचा सल्ला कृषी विभागाने दिला.
कृषी विभागाने दिलेल्या पत्रकानुसार, पट्टा पद्धतीने धानाची रोवणी केल्यास धान पिकाचे तुडतुड्यापासून व्यवस्थापन करुन चांगले उत्पादन घेता येते. याकरिता सेंद्रीय खताचा, हिरवळीच्या खताचा, गराडीच्या पानाचा, जैविक खतांचा व रासायनिक खतांचा किटकनाशकाचा शिफारसीप्रमाणे योग्य प्रमाणात काळजी घेऊन वापर करावा. पट्टा पद्धतीने रोवणी केल्यास पट्ट्याची ३० ते ४० सेमी मोकळी जागा सोडण्यात येत असल्याने सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचतो. तसेच हवा खेळती राहत असल्याने तुडतुड्याच्या वाढीस व प्रसारास नैसर्गिक अडथळा निर्माण होतो.
त्याचप्राणे मोकळ्या पट्ट्यातून पिकांचे निरीक्षण करणे, फवारणी करणे तसेच धान बिजोत्पादकांना भेसळ काढणे सहज शक्य होते. शेतकºयांनी कीडरोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी भात पिकाची पट्टा पद्धतीने रोवणी करण्यासाठी पुढे यावे. याकरिता शेतकºयांनी लवकर येणाºया धान २० गुणीला २० सेमी अंतरावर तसेच मध्यम व उशिरा कालावधीच्या वाणांची २५ गुणीला २५ सेमी अंतरावर प्रती २ ते ३ रोप घेऊन दोरीच्या सहाय्याने उथक व सरळ रोवणी करावी.
तसेच १० ओळी सलग झाल्यानंतर ३० ते ४० सेमी अंतर सोडावे किंवा १० फूट रोवणी झाल्यानंतर ३० ते ४० सेमी अंतर सोडून पुन्हा रोवणीस सुरुवात करावी. पट्टा पद्धती शेतकºयांना परवडणारी असून उत्पादनात वाढ होत असल्याने भाताची रोवणी पट्टा पद्धतीने करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.