अवैध धंद्यांना लगाम लावण्यासाठी एसपीचे मिशन ‘तडीपार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:29 AM2021-01-20T04:29:18+5:302021-01-20T04:29:18+5:30
नरेश रहिले / लोकमत विशेष गोंदिया : प्रशासनाने रेती घाटाचे लिलाव केले किंवा नाही केले तरी रेती चोरून विक्री ...
नरेश रहिले / लोकमत विशेष
गोंदिया : प्रशासनाने रेती घाटाचे लिलाव केले किंवा नाही केले तरी रेती चोरून विक्री केली जाते. अवैध दारूचाही महापूर वाहत असतो. या अवैध धंदे करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली तरी जामिनावर सुटून आले की ते पुन्हा जोमाने अवैध धंदे करतात. त्यांच्यावर लगाम लावण्यासाठी आता पोलीस अधीक्षकांनी मुंबई पोलीस कायद्याचे कलम ५५ चा वापर करून एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १८ अवैध व्यावसायिकांना तडीपार केले आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासात मुंबई पोलीस कायद्याच्या कलम ५५ चा पहिल्यांदा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी वापर केला आहे. दारू किंवा अवैध रेती उत्खननामुळे शासनाचा महसूल बुडतो. शासनाचा महसूल बुडवून रेती अव्वाच्या सव्वा भावात विक्री करणाऱ्या रेतीमाफियांच्या टोळ्या सक्रिय होत आहेत. जिल्ह्यात दारू व रेतीसंदर्भात तयार झालेल्या अशाच चार टोळ्यांतील १८ जणांना गोंदिया जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी काढले आहेत. रेती चोरीचे काम करता-करता गब्बर झालेले लोक कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवरही हल्ला करतात. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रेतीमाफियांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत आहे. त्यादृष्टीने जिल्हा पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी ११ जानेवारी रोजी अवैध धंदे करणाऱ्या १८ जणांना तडीपार केले आहे. अवैध धंद्यासाठी कलम ५५ च्या अधिकाराचा वापर करून त्यांना तडीपार करण्यात आले आहे.
बॉक्स
रेतीमाफिये ६ तर सट्टा व दारू व्यावसायिक १२
तडीपार केलेल्या १८ पैकी ६ अवैध रेतीचा व्यवसाय करणारे आहेत. तर १२ लोक दारू व सट्टाचा व्यवसाय करणारे आहेत. तडीपार करण्यात आलेल्या आरोपींत आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत ४, गोंदिया ग्रामीण २, रावणवाडी ६ तर गोंदिया शहरातील ६ आरोपींचा समावेश आहे.
कोट
अवैध धंद्यावर लगाम लावण्यासाठी मुंबई पोलीस कायद्याचे कलम ५५ अन्वये १८ जणांना तडीपार करण्यात आले आहे. अवैध धंदे करणाऱ्यांची खैर नाही. वाममार्गातून अधिक मिळकत मिळविण्याच्या नादात असलेल्यांचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी गोंदिया पोलीस तत्पर आहेत.
- विश्व पानसरे, पोलीस अधीक्षक, गोंदिया.