एसटी आणि रेल्वेत वाढत आहे प्रवाशांची वर्दळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:36 AM2021-06-09T04:36:34+5:302021-06-09T04:36:34+5:30
गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मागील सुमारे दोन महिन्यांपासून असलेल्या लॉकडाऊनमध्ये आता जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शिथिलता देण्यात ...
गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मागील सुमारे दोन महिन्यांपासून असलेल्या लॉकडाऊनमध्ये आता जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शिथिलता देण्यात आली आहे. सोमवारपासून (दि.७) जिल्ह्यात अनलॉकची अंमलबजावणी करण्यात आली असून प्रवासी सेवाही सुरू झाली आहे. जिल्ह्यात कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव व अनलॉकमुळे आता नागरिकांच्या मनातील भीतीही कमी झाली आहे. परिणामी नागरिक आता आपल्या कामांसाठी घराबाहेर पडत असताना दिसत आहे. यामुळे आता एसटी आणि रेल्वेने प्रवासही त्यांनी सुरू केला असल्याने एसटी आणि रेल्वेत वर्दळ होऊ लागली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात नागरिकांना प्रवासासाठी एसटी व रेल्वे मार्ग हे दोघेही सोयीस्कर पडत असल्याने नागरिक आपल्या सोयीने प्रवासाला प्राधान्य देत आहेत. मात्र एसटीच्या फेऱ्या आता हळूवार वाढत असून शुकशुकाट असलेल्या बस स्थानकावर व रेल्वे स्थानकावरही नागरिकांची गर्दी दिसू लागली आहे.
-----------------------------
- जिल्ह्यात रोज एसटीच्या फेऱ्या- ५०
- रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या - ३००- ५००
- धावणाऱ्या रेल्वेंची संख्या- ३७
- प्रवासी - दोन हजार
-----------------------
एसटीत नागपूर मार्गावर गर्दी
गोंदिया आगारासाठी नागपूर मार्ग महत्त्वाचा आहे. या मार्गावर बाराही महिने प्रवासी राहतात. कारण, एसटीने नागपूरला जाताना भंडारा जिल्हा पडत असून पूर्वी गोंदिया जिल्हा भंडारातच येत असल्याने आजही कित्येक विभागांच्या कार्यालयांचा कारभार आजही तेथूनच चालत आहे. पुढे नागपूर येथे शिक्षण, उपचार, खरेदी तसेच मुख्य कार्यालय असल्याने कामकाजासाठी नागपूरला ये-जा असतेच.
---------------------------
रेल्वेच्या मुंबई मार्गावर गर्दी
राज्याचा संपूर्ण कारभारच मुंबई येथून चालत असल्याने शासकीय अधिकारी-कर्मचारी म्हणा, येथील व्यापारी किंवा नेते मंडळी यांना मुंबई गाठावीच लागते. शासकीय कामकाजासाठी अधिकाऱ्यांचे दौरे नेहमीच सुरू असतात. तर गोंदिया शहराला मिनी मुंबई म्हटले जात असून मोठी बाजारपेठ असल्याने व्यापारी व्यवसाय व खरेदीसाठी मुंबईला ये-जा करत असतात.
---------------------------
प्रवासी कोट
मागील सुमारे दोन महिन्यांपासून कामकाज ठप्प पडले होते. आता मात्र कोरोना नियंत्रणात आल्याने त्यातच अनलॉक झाल्याने कामकाज सुरू करावे लागेल. त्यामुळे एसटीने आता प्रवास सुरू केला आहे.
- घनशाम दमाहे (बस प्रवासी)
--------------------
लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प पडला आहे. प्रवास करता येत नसल्याने चांगलेच नुकसान झाले आहे. मात्र आता घरी बसून राहणे शक्य नसल्याने व शासनाने शिथिलता दिल्याने आता कामकाज सुरू केले आहे. त्यामुळे कामानिमित्त प्रवास करावा लागत आहे.
- कुवरलाल पटले (बस प्रवासी)
--------------------------------
नोकरीनिमित्त आम्हाला अपडाऊन करावे लागते. लॉकडाऊनमध्ये रेल्वे बंद असल्याने दुचाकीने प्रवास करावा लागत होता. मात्र ते परवडणारे नाही. आता रेल्वे सुरू झाल्याने आमची सोय झाली आहे.
- राजेश शहारे (रेल्वे प्रवासी)
----------------------------------
रेल्वे बंद असल्याने आता खासगी वाहनाने प्रवास करावा लागत होता. ते सुरक्षित नसून खिशाला परवडणारेही नाही. आता कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली असून रेल्वे सुरू झाल्याने प्रवासाची सुविधा झाली आहे.
- अरूण उपासे (रेल्वे प्रवासी)
--------------------------------------
कोट
जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात आल्याने आता शिथिलता मिळाल्याने नागरिकांनी घराबाहेर पडण्यास सुरूवात केली आहे. परिणामी बसस्थानकातच उभ्या असलेल्या एसटी आता धावू लागल्या आहेत. अत्यावश्यक कामे शिवाय आता सामान्य नागरिकही आपल्या कामाला लागले असून त्यांचा प्रवास सुरू झाला आहे.
- संजना पटले
आगार प्रमुख, गोंदिया.
---------------------------------
कोट
रेल्वेने १ जूनपासून काही लोकल गाड्या सुरु केल्या आहे. तर हावडा मुंबई मार्गावरच्या नियमित गाड्या सुरु आहे. मागील तीन चार दिवसांपासून रेल्वेच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. अनलॉक झाल्यानंतर आता पुन्हा प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता असून त्या दृष्टीने नियोजन सुरु आहे.
- ए.के.राय, जनसंपर्क अधिकारी.