जिल्ह्यातील २१३ विद्यार्थिनींना एसटीचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 09:45 PM2019-01-21T21:45:56+5:302019-01-21T21:46:39+5:30
शिक्षणासाठी मुलींना मोफत प्रवासाची सुविधा देणाऱ्या ‘अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेची’ व्याप्ती आता वाढविण्यात आली आहे. वर्ग ५ ते १० पर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी असलेल्या या योजनेत आता इयत्ता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना सुविधा देण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. जिल्ह्यातील २१३ विद्यार्थिनींना या नव्या योजनेमुळे मोफत प्रवासाची सुविधा मिळाली आहे.
कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शिक्षणासाठी मुलींना मोफत प्रवासाची सुविधा देणाऱ्या ‘अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेची’ व्याप्ती आता वाढविण्यात आली आहे. वर्ग ५ ते १० पर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी असलेल्या या योजनेत आता इयत्ता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना सुविधा देण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. जिल्ह्यातील २१३ विद्यार्थिनींना या नव्या योजनेमुळे मोफत प्रवासाची सुविधा मिळाली आहे.
ग्रामीण भागात आजही कित्येक गावांत शिक्षणाची सोय नसल्याने मुलींना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. गावात शाळा किंवा महाविद्यालय नसल्याने परगावी शिक्षणासाठी जाऊ देण्याची परवानगी आजही पालक देत नाहीत. यात कित्येकांना मुलींच्या बाहेरगावी ये-जा करण्याचा खर्च परवडणारा नसतो. अशात मुलींना मन मारून शिक्षण मधातच सोडावे लागते. मात्र ग्रामीण भागातील मुलींनाही शिक्षण घेऊन पुढे जाता यावे. यासाठी ग्रामीण भागातील माध्यमिक शिक्षणाची सोय नसलेल्या ठिकाणापासून सोईच्या ठिकाणापर्यंत मोफत प्रवासाची सुविधा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने करून दिली.
यासाठी ‘अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजना’राबविली जात आहे. या योजनेंतर्गत वर्ग ५ ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत प्रवासाची सुविधा होती.
१० वी नंतरच्या विद्यार्थिनींना या योजनेतून वगळण्यात आले होते. अशात अशा मुलींचे १० वी नंतरचे शिक्षण धोक्यात येत होते. नेमकी हीच बाब लक्षात घेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ‘अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजनेची’ व्याप्ती वाढवून १२ वीपर्यंतच्या विद्यार्थिनींना योजनेत समाविष्ट करून घेतले आहे. त्यामुळे आता १२ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींना या योजनेंतर्गत शिक्षणासाठी मोफत प्रवासाची सोय मिळत आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील २१३ विद्यार्थिनींनी आपले पास काढून घेतले असून मोफत प्रवास योजनेचा लाभ घेत आहेत.
१० वी पर्यंतच्या २५३६ विद्यार्थिंनीना सवलत
अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजना पूर्वी वर्ग ५ ते १० पर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी होती. या गटातील विद्यार्थिनींची संख्या जास्त असल्याने जिल्ह्यातील २५३६ विद्यार्थिनींनी या योजनेतंर्गत आपले पास काढून घेतल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील २५३६ विद्यार्थिनी या योजनेच्या लाभार्थी असून शिक्षणासाठी योजनेंतर्गत मोफत प्रवासाचा लाभ घेत आहेत.
आॅक्टोबर महिन्यात निघाले आदेश
यापूर्वी वर्ग ५ ते १० पर्यंत शिकणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी ही योजना राबविली जात होती. मात्र १२ वी पर्यंतच्या कित्येक विद्यार्थिनींना महाविद्यालयात ये-जा करण्यासाठी पैसे मोजावे लागत होते. अशात अशा विद्यार्थिनींना शिक्षणात किमान प्रवासाची तरी सुविधा देता यावी या दृष्टीकोनातून ‘अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजनेत बदल करण्यात आला. यासाठी आॅक्टोबर २०१८ मध्ये तसे आदेश काढण्यात आले आहेत.