एसटी महामंडळ नफ्यातच
By admin | Published: January 14, 2016 02:19 AM2016-01-14T02:19:07+5:302016-01-14T02:19:07+5:30
सुखाचा व सुरक्षित प्रवास म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेकडे बघितले जाते.
तोट्याचा व्यर्थ कांगावा : गोंदिया आगाराला नऊ महिन्यात सात कोटींचा नफा
देवानंद शहारे गोंदिया
सुखाचा व सुरक्षित प्रवास म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेकडे बघितले जाते. खासगी प्रवासी वाहतुकीपेक्षा एसटी महामंडळाचे तिकीट दर जास्त असतानाही नेहमी महामंडळ तोट्यात चालत असल्याचा कांगावा वरिष्ठ स्तरावर केला जातो. मात्र प्रत्यक्षात एसटी महामंडळ नफ्यातच असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. एकट्या गोंदिया आगाराला गेल्या ९ महिन्यात ७ कोटींचा नफा झाला आहे.
रेल्वेचे जाळे लाभलेल्या गोंदिया जिल्ह्यात रस्ता मार्गे प्रवास करणारे प्रवासी कमी असले तरी काही भागात एसटी बसशिवाय दुसरा पर्याय नाही. ‘हात दाखवा, बस थांबवा’ असे ब्रिदच जणू ग्रामीण भागात रूळले आहे. त्यामुळेच एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांमध्ये गोंदिया आगाराला मिळालेल्या उत्पन्नापेक्षा सन २०१५ च्या नऊ महिन्यांत तब्बल २ कोटी ५ लाख ३५ लाख रूपयांचे जास्त उत्पन्न मिळाले आहे.
रा.प. महामंडळाच्या गोंदिया आगाराला तिकीटातील सवलतीसह एकूण उत्पन्न २३ कोटी ७२ लाख ५८ हजार रूपये मिळाले. सन २०१४ मध्ये याच कालखंडात गोंदिया आगाराला २१ कोटी ६७ लाख २३ रुपये एवढे उत्पन्न झाले होते. यात तब्बल २ कोटी ५ लाख ३५ हजार रूपयांचा फरक असून एवढे अधिकचे उत्पन्न सन २०१४ च्या तुलनेत सन २०१५ मध्ये झाले आहे.
सन २०१५ मध्ये एप्रिल ते डिसेंबरपर्यंतच्या प्रवासासाठी गोंदिया आगाराच्या बसेसमध्ये १४.१० लाख लिटर डिझेल लागले. त्यासाठी ७ कोटी ४३ लाख ७६ हजार रूपयांचा खर्च आला.
सन २०१४ मध्ये एप्रिल ते डिसेंबरपर्यंतच्या प्रवासासाठी बसेसमध्ये १३.३३ लाख लिटर डिझेल लागले होता. त्यासाठी ८ कोटी ४७ लाख ६६ हजार रूपयांचा खर्च आला होता.
खर्चापेक्षा उत्पन्न अधिक
एप्रिल ते डिसेंबर २०१५ या नऊ महिन्यांत गोंदिया आगाराला डिझेल व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनावर एकूण १३ कोटी ९२ लाख ८४ हजार रूपये खर्च आला. या कालखंडात उत्पन्न २३ कोटी ७२ लाख ५८ लाख रूपयांचे झाले. त्यामुळे गोंदिया आगराला या नऊ महिन्यांत खर्चापेक्षा ९ कोटी ७९ लाख ७४ हजार रूपयांचे अधिकचे उत्पन्न झाले. सन २०१४ मध्ये याच काळात गोंदिया आगारात डिझेल व वेतन खर्च मिळून १५ कोटी ६ लाख ९५ हजार रूपयांचा खर्च आला. त्या तुलनेत उत्पन्न २१ कोटी ६७ लाख २३ हजार रूपये झाले होते. हे उत्पन्नसुद्धा ६ कोटी ६० लाख २८ हजार रूपयांनी वाढले आहे. सन २०१४ व २०१५ या दोन्ही वर्षात गोंदिया आगाराला खर्चापेक्षा अधिक उत्पन्न मिळाल्याचे दिसून येते.