जिल्ह्यात एसटीची सेवा सुरळीत सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2021 05:00 AM2021-10-29T05:00:00+5:302021-10-29T05:00:11+5:30
एसटी महामंडळातील कर्मचारी त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे त्रस्त आहेत. त्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून कर्मचाऱ्यांना अधिकच त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार पगार थकत असल्याने एसटी कर्मचारी चांगलेच अडचणीत आले आहेत. शिवाय जीव धोक्यात घालून सेवा देऊनही त्यांना राज्य शासन कर्मचाऱ्यांप्रमाणे काहीच सुविधा नाहीत. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांत मोठ्या प्रमाणात रोष आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांची पूर्तता होत नसल्याने त्रस्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी बुधवापासून (दि. २७) बेमुदत उपोषण छेडले आहे. यामुळे राज्यात काही ठिकाणी एसटीची सेवा बंद आहे. मात्र या उपोषणाचे जिल्ह्यात काहीच परिणाम दिसून आले नसून एसटीची सेवा सुरळीत सुरू आहे.
एसटी महामंडळातील कर्मचारी त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे त्रस्त आहेत. त्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून कर्मचाऱ्यांना अधिकच त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार पगार थकत असल्याने एसटी कर्मचारी चांगलेच अडचणीत आले आहेत. शिवाय जीव धोक्यात घालून सेवा देऊनही त्यांना राज्य शासन कर्मचाऱ्यांप्रमाणे काहीच सुविधा नाहीत. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांत मोठ्या प्रमाणात रोष आहे.
विशेष म्हणजे, वारंवार पगार थकत असून आता दिवाळी तोंडावर असताना ऑक्टोबर महिन्याच्या पगाराबाबत काहीच सांगणे कठीण आहे.
या व अन्य कारणांमुळे कर्मचारी संतप्त असून महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने बुधवारपासून (दि. २८) बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.
विशेष म्हणजे, या उपोषणांतर्गत राज्यातील काही ठिकाणी एसटीची सेवा कडकडीत बंद ठेवण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा या दोन्ही आगारातील एसटीची सेवा सुरळीतपणे सुरू आहे. यामुळे आता ऐन दिवाळीच्या तोंडावर जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय झाली नाही.
या आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या
- एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता दिवाळीपूर्वी द्यावा, वाढीव घरभाडे ८, १६, २४ या दराने द्यावे, सर्व सण उचल १२ हजार ५०० रुपये द्यावे, वार्षिक वेतन वाढ २ टक्के वरून ३ टक्के द्यावी, न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे ठरलेल्या तारखेस नियमित वेतन द्यावे, दिवाळी बोनस १५ हजार रुपये द्यावे आदी मागण्यांसाठी हे बेमुदत उपोषण केले जात आहे.