स्थायी समितीत गाजला लोकमत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 09:16 PM2019-04-17T21:16:43+5:302019-04-17T21:17:08+5:30
उन्हाळ्याला सुरूवात होवून महिनाभराचा कालावधी लोटला मात्र जि.प.पाणी पुरवठा विभाग आणि जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना करण्याकडे दुर्लक्ष केल्याने जिल्हावासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देण्याची पाळी आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : उन्हाळ्याला सुरूवात होवून महिनाभराचा कालावधी लोटला मात्र जि.प.पाणी पुरवठा विभाग आणि जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना करण्याकडे दुर्लक्ष केल्याने जिल्हावासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देण्याची पाळी आली आहे. लोकमतने हा विषय लावून धरल्यानंतर मंगळवारी (दि.१६) आयोजित जि.प.स्थायी समितीच्या सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी लोकमतच्या वृत्ताचा दाखल देत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे स्थायी समितीच्या सभेत केवळ लोकमतचीच चर्चा होती.
लोकसभा निवडणुकीनंतर मंगळवारी (दि.१६) जिल्हा परिषदेची पहिली स्थायी समितीची सभा घेण्यात आली. या सभेत पूर्व नियोजित पाणी टंचाई निवारण व व्यवस्थापनावर चांगलीच चर्चा झाली. दरम्यान, यांत्रिकी विभाग व पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर घेण्यात आले.सडक-अर्जुनी येथे नियमांना धाब्यावर बसवून जुने पाईप विक्री करण्यात आली. याबाबतची चौकशी करुन दोषी अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात आली. यावर लेखाधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आले. एकंदरीत ही सभा पाणी टंचाईच्या मुद्दावर चांगलीच गाजली.
लोकसभा निवडणुकीमुळे मागील महिनाभरापासून जिल्हा परिषदेच्या कोणत्याही समितीची सभा घेण्यात आली नव्हती. त्यानंतर मंगळवारी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात झाली. पाणी टंचाई निवारणासाठी उपाय योजनांच्या कामांवर चर्चा सुरु झाली. मात्र, चर्चेदरम्यान पाणी पुरवठा व यांत्रिकी विभागाकडून पाणी टंचाईच्या तिसºया व चौथ्या टप्प्याचा कसलाही आढावा सादर करण्यात आला नाही. विभागाकडे आढावा ही तयार नसल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनात आली. यावरुन जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, पी.जी.कटरे, सुरेश हर्षे, राजलक्ष्मी तुरकर यांनी विभागाच्या अधिकाºयांवर चांगलाच संताप व्यक्त केला. दरम्यान, यंत्रणा जिल्ह्यातील पाणी टंचाईला घेवून गंभीर नसल्याचा आरोपही केला. चर्चेदरम्यान सदस्यांनी लोकमतने पाणी टंचाईच्या मुद्दावर प्रकाशित केलेल्या वृत्ताचा दाखल दिला. तसेच उन्हाळ्याला सुरूवात होवूनही पाणी टंचाईचा आराखडा तयार केला नसल्याबद्दल संताप व्यक्त केला.
मागील दोन वर्षांपासून देखभाल दुरुस्ती लेखा शिर्षका अंतर्गत बोअरवेलचे पाईप खरेदी करण्यात आले नाही. यंदाही मागणी पाहता बोअरवेल पाईप खरेदी करण्यात यावे, अशी विनंती सभागृहाच्या सदस्यांनी केली. तसा ठरावही घेण्यात आला. जिल्हा परिषद प्रशासनाकडे ३ हजार पाईप पडून आहेत. ते पाईप प्रत्येक तालुक्याला प्रमाणात वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी सडक-अर्जुनी येथील खंडविकास अधिकारी यांच्या मनमर्जी कारभारावर प्रश्न उपस्थित करीत मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापित समितीच्या माध्यमातून जुन्या पाईपची विक्री व लिलाव केला जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला.
चौकशी समिती गठीत
सडक-अर्जुनीच्या खंडविकास अधिकारी यांनी स्वत: अडीच तीन लाख रुपये किंमतीचे पाईप २३ हजारामध्ये लिलाव केले. हे नियमबाह्य कामे झाली आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. या प्रश्नाला जि.प.सदस्य पी.जी.कटरे, राजलक्ष्मी तुरकर यांनीही दुजोरा दिला. यावर लेखाअधिकारी मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी समिती स्थापित करुन प्रकरणाची चौकशी करण्याची ग्वाही देण्यात आली.
मनरेगाची कामे केव्हा सुरू करणार
यानंतर जिल्ह्यात अद्यापही पर्याप्त प्रमाणात मग्रारोहयोची कामे सुरु झाली नाहीत. आजघडीला फक्त १७ हजार मजुराच्या हाताला काम मिळाले आहे. या मागचे कारण काय?असा प्रश्न पी.जी.कटरे व गंगाधर परशुरामकर, सुरेश हर्षे यांनी उपस्थित केला. दरम्यान, लवकरात लवकर जास्तीत जास्त कामे सुरु करण्यात येतील अशी ग्वाही मुकाअच्या माध्यमातून देण्यात आली.