मेहनतीने बहरतील खेड्यातील ‘स्टार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:53 AM2018-10-03T00:53:33+5:302018-10-03T00:53:46+5:30
खेड्यातील मुला-मुलींमध्ये अनेक सुप्त गुण असतात. परंतु त्या गुणांना पाहिजे त्या प्रमाणात वाव मिळत नाही. परंतु एखाद्याने मनात जिद्द, चिकाटी बाळगून दररोज कठिण परिश्रम केले तर त्याला आपोआपच मार्ग मिळत जातो. कुठल्याही परिस्थितीत आपल्यातील आत्मविश्वास कमी होऊ देऊ नये,...
मोनिका आथरे : लंडनच्या आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धेतील धावपटू
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : खेड्यातील मुला-मुलींमध्ये अनेक सुप्त गुण असतात. परंतु त्या गुणांना पाहिजे त्या प्रमाणात वाव मिळत नाही. परंतु एखाद्याने मनात जिद्द, चिकाटी बाळगून दररोज कठिण परिश्रम केले तर त्याला आपोआपच मार्ग मिळत जातो. कुठल्याही परिस्थितीत आपल्यातील आत्मविश्वास कमी होऊ देऊ नये, कठिण परिश्रम करण्याची सवय आपल्या शरीराला लावावी, आपल्या लक्ष्याकडे धावता-धावता मार्ग मिळत जातो. यातूनच खेड्यातील मुले-मुली विविध क्षेत्रातील स्टार बनतील, असे लंडनच्या आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धेतील धावपटू मोनिका आथरे यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत दरम्यान सांगितले.
गोंदिया पोलीस दलातर्फे आयोजित अहिंसा मॅराथॉन स्पर्धेच्या बक्षीस वितरणाप्रसंगी प्राहुणे म्हणून आलेल्या मोनिका आथरे यांनी लोकमतला खास मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ग्रामीण भागातील मुले-मुली कसे विकसीत होतील यावर जास्त जोर दिला. त्या म्हणाल्या मी एका खेडे गावातील आहे. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव (केतकी) या खेडेगावात शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. आजही वडील शेतीचेच काम करतात. मला दोन भाऊ, एक बहिण आहे. शाळा शिकत असताना माझा क्रीडा क्षेत्राकडे कल होता. तालुका, जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेत भाग घ्यायची त्यात क्रमांक यायचा. प्रत्येक स्पर्धा जिंकण्याची जिद्द माझ्या मनात असायची, एक छोटी स्पर्धा जिंकली की लगेच मोठ्या स्पर्धेची तयार करायची, त्यातून मी प्रत्येक स्पर्धेत यशस्वी व्हावे ही जिद्द उराशी बागळगत गेले. त्यातूनच मोठे यश प्राप्त झाले.
आज घडलीला २८ वर्षाच्या वयात असलेल्या मोनिका आथरे यांनी मुंबई, ठाणे, वसई, कलकत्ता, दिल्ली, हैदराबाद अशा अनेक मॅराथॉनमध्ये भाग घेतला आहे. आजपर्यंत ३७ हाफ मॅरेथान व ३ फूल मॅराथॉनमध्ये भाग घेतला. हाफ मॅराथॉन एक तास १५ मिमिटात तर जागतिक स्तरावर २०१७ मध्ये लंडन येथे आयोजित फूल मॅराथॉन स्पर्धा २ तास ३९ मिनिटात पूर्ण केला. मागील १७ वर्षापासून मोनिका खेळामध्ये सक्रिय आहेत.
सन २०१२ पासून मॅराथॉनला सुरूवात केल्याचे त्या म्हणाल्या. एम.ए. पर्यंत शिक्षण पूर्ण केले. विजेंदरसिंग यांनी प्रशिक्षण दिले आहे. ते माझे कोच असून मला नेहमीच मार्गदर्शन करतात. या शिवाय लाईफ इंन्ससुरन्स कार्पोरेशन या संस्थेत सहाय्यक व्यवस्थापक पदावर काम करीत आहेत.
जिद्द, चिकाटीतून यशाचे उंच शिखर गाठता येते. आम्ही खेड्यातील आहोत म्हणून अनेकांमध्ये न्यूनगंड असतो. तो बाजूला सारून यशाच्या वाटेवर चालण्यासाठी तयार व्हा. कुठलेही मोठे काम करताना अडचणी येतात. परंतु त्या अडचणींवर मात करीत आपला ‘फोकस’ टार्गेट असावा.
खेड्यात मुलींना खूप अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु अडचणी येणार नाही तर जिंकण्याचा आनंदही मिळत नाही. अडचणींना सामोरे जात विजयी झालोत तर त्याचा आनंद काही औरच असतो. खेड्यातही मोठे स्टार लपले आहेत स्वत:ला ओखळा आणि कामाला लागा, असा मोनिकाने युवक युवतींना दिला.