गोंदिया शहरात अतिरिक्त लसीकरण वॉर्ड सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:37 AM2021-04-30T04:37:20+5:302021-04-30T04:37:20+5:30
गोंदिया : सध्या ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत आहे. शहरात कुंभारेनगर आणि बाई गंगाबाई ...
गोंदिया : सध्या ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत आहे. शहरात कुंभारेनगर आणि बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय या दोनच ठिकाणी लसीकरण करण्यात येत आहे. शहराची लोकसंख्या विचारात घेत ते पुरेसे नसून लसीकरण वॉर्डची संख्या वाढविण्यात यावी असे निर्देश आमदार विनोद अग्रवाल यांनी दिले.
लसीकरण मोहिमेसंदर्भात उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. गोंदिया शहराची लोकसंख्या विचारात घेता ७ ते ८ लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे. मरारटोली आणि गोविंदपूर येथे अतिरिक्त लसीकरण केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे. जे. एम. हाईस्कूल, माताटोली स्कूल, मारवाडी स्कूल गर्ल्स हायस्कूल, रामनगर स्कूल, गणेशनगर स्कूल येथे सुद्धा लसीकरण केंद्र सुरू करण्याचे निर्देश आमदार विनोद अग्रवाल यांनी दिले. बैठकीला उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे, तहसीलदार आदेश डफळ, अतिरिक्त तहसीलदार अनिल खडतकर, गटविकास अधिकारी पी.डी.निर्वाण, न. प. मुख्याधिकारी करण चौहान, तालुका आरोग्य अधिकारी वेदप्रकाश चौरागडे, सिव्हिल सर्जन डॉ. प्रशांत तुरकर आणि नायब तहसीलदार पालांदूरकर उपस्थित होते.