कीडरोगामुळे झालेल्या नुकसानीचे वाटप सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:01 AM2018-06-14T00:01:34+5:302018-06-14T00:01:34+5:30
जिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाला. परिणामी धानपिकांवर मोठ्या प्रमाणात कीडरोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कीडरोगांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : जिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाला. परिणामी धानपिकांवर मोठ्या प्रमाणात कीडरोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कीडरोगांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. त्याचीच दखल घेत शासनाने कीडरोगांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर केली. याचा निधी देखील अर्जुनी मोरगाव तालुक्याला प्राप्त झाला असून त्या मदतीचे वाटप सुरू करण्यात आले.
अर्जुनी-मोरगाव तालुक्याला कीडरोगांमुळे झालेल्या नुकसान भरपाईचे वाटप करण्यासाठी ५ कोटी ६९ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. आत्तापर्यंत २ कोटी ९९ लाख रुपयांचे धनादेश बँकेत जमा करुन थेट लाभार्थी शेतकºयाच्या बचत खात्यावर जमा केला जात आहे. शेतकºयांनी स्वत:च्या बचत खात्याची माहिती संबंधित तलाठ्याकडे विना विलंब द्यावी, असे तहसीलदार धनंजय देशमुख यांनी कळविले आहे. तालुक्यात मागील खरीप हंगामात मावा तुडतुड्यामुळे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तालुक्यातील ४ हजार ६५० हेक्टर क्षेत्रातील धान पिकाचे कीडरोगांमुळे नुकसान झाले होते. कीडरोगांमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी तालुक्यातील २४ हजार २११ पात्र ठरले असून त्यासाठी ५ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. पहिल्या टप्प्यात २ कोटी ९९ लाखांचे अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक बचत खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ओलीतासाठी प्रती हेक्टर १३ हजार ५०० तर कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रती हेक्टर ७ हजार ५०० रुपये इतर नुकसानग्रस्तांसाठी कमीत कमी एक हजार रुपये नुकसान भरपाई दिली जात आहे.