शासकीय आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:29 AM2021-04-27T04:29:55+5:302021-04-27T04:29:55+5:30
बोंडगावदेवी : परिसरातील शेतकऱ्यांनी स्वत: कर्जबाजारी होऊन शेतामध्ये बोअरवेल तयार केली. शेतीपिकाला लागणाऱ्या बारमाही सिंचनाची सोय केली. गावागावांतील शेतामध्ये ...
बोंडगावदेवी : परिसरातील शेतकऱ्यांनी स्वत: कर्जबाजारी होऊन शेतामध्ये बोअरवेल तयार केली. शेतीपिकाला लागणाऱ्या बारमाही सिंचनाची सोय केली. गावागावांतील शेतामध्ये धानाचे पीक मोठ्या डौलाने उभे आहे. हातचे पाणी असल्याने रब्बी धानाचे पीक शेतकऱ्यांच्या घरात येऊ लागले. खासगी कर्जाची उचल करुन उन्हाळी धान पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना पडक्या भावानी व्यापाऱ्यांना विकण्याची वेळ येणार नाही. यासाठी शासकीय आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्र त्वरित सुरु करण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती लायकराम भेंडारकर यांनी केली.
परिसरातील शेतकऱ्यांचा शेती हाच एकमेव मुख्य व्यवसाय आहे. बारमाही शेतीमध्ये राबराबून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा नित्यनेम आहे. परिसरात जलसिंचनाच्या सोयींचा अभाव प्रकर्षाने जाणवितो. शेतीशिवाय पर्यायी दुसरा व्यवसाय उपलब्ध नसल्याने, बहुतांश शेतकऱ्यांनी खासगी कर्जाची उचल करुन पै-पै जमा करून शेतामध्ये बोअरवेल खोदून सिंचनाची सोय केली. उपलब्ध झालेल्या पाण्याचा योग्य प्रमाणात निचरा होण्यासाठी धानाच्या पिकांसह नगदी पिकांचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांनी आपला कल वळविला. उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली. येत्या आठवड्यात धानाचे उत्पादन शेतकऱ्यांच्या दारात येणार आहे. काही गावांमध्ये धानाच्या कापणीला सुरु झाली आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य भाव मिळावा. खासगी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने धान विकण्याची वेळ येऊ नये. यासाठी आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्र विनाविलंब सुरू करण्याची मागणी बाजार समितीचे माजी उपसभापती लायकराम भेंडारकर यांनी केली.
......
आधारभूत केंद्रावर धान दिले,चुकारे केव्हा मिळणार हो!
खरीप हंगामाचे धान शासकीय आधारभूत हमीभाव धान केंद्रावर परिसरातील शेतकऱ्यांनी दिले. हमीभाव धान केंद्रावर विक्री केलेल्या धानाचे पैसे एकावेळी मिळतील अशी आशा होती. धान विक्रीचे पैसे भेटताच पीककर्जाची परतफेड मुदतीच्या आत करता येईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. केंद्रावर धान विक्री करुन बऱ्याच कालावधी झाला. पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही जमा झाला नाही. व्याजमाफीचा लाभ घेण्यासाठी परत एकदा खासगी सावकाराचा शोध घ्यावा लागला. उन्हाळी हंगामाचा धान विक्रीला आला परंतु खरीप हंगामातील धानाचे पैसे खात्यात जमा झाले नाही.
- जीवन बोरकर, शेतकरी, सोमलपूर