धान खरेदी केंद्र सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:27 AM2021-05-23T04:27:54+5:302021-05-23T04:27:54+5:30
गोंदिया : शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील धानाची कापणी सुरू झाली असूनही अद्याप धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. अशात शेतकऱ्यांच्या ...
गोंदिया : शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील धानाची कापणी सुरू झाली असूनही अद्याप धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. अशात शेतकऱ्यांच्या धानाला योग्य तो भाव मिळत नसल्याने त्यांची पिळवणूक होत आहे. ही गंभीर बाब बघता लवकरात लवकर शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक पंकज यादव यांनी केली असून जिल्हाधिकारी व मार्केटिंग फेडरेशन अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
जिल्ह्यात धानाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जात असून यामुळेच जिल्हा धानाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. आता रब्बी हंगामातील धानाची कापणी सुरू झाली असूनही धान खरेदी साठी केंद्र सुरू झालेले नाही. त्यात आता खरिपाचा हंगाम तोंडावर आला आहे. अशात शेतकऱ्यांना पैशांची जुळवाजुळव करावी लागत असून, याचा फायदा घेत व्यापारी कमी दरात शेतकऱ्यांचे धान खरेदी करून त्यांची पिळवणूक करतात.
अशात फेडरेशनने खरेदी केलेल्या खरिपातील धानाची उचल करून रब्बी हंगामातील धानाच्या खरेदीसाठी केंद्र सुरू करण्याची गरज आहे. काही दिवसांत पावसाळा सुरू होणार असून, धान खरेदी केंद्र सुरू न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार. करिता लवकरात लवकर धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी यादव यांनी जिल्हाधिकारी व मार्केटिंग फेडरेशन अधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे.