भरडाईचे नियोजन करून त्वरित धान खरेदी केंद्र सुरू करा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:22 AM2021-05-29T04:22:47+5:302021-05-29T04:22:47+5:30
गोंदिया : रब्बी हंगामातील शासकीय धान खरेदी करण्यास मंजुरी दिल्यानंतरही जिल्ह्यात पर्याप्त प्रमाणात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले ...
गोंदिया : रब्बी हंगामातील शासकीय धान खरेदी करण्यास मंजुरी दिल्यानंतरही जिल्ह्यात पर्याप्त प्रमाणात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. ही बाब खा. प्रफुल पटेल यांच्या माध्यमातून माजी आमदार राजेंद्र जैन व आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या निदर्शनास आणून दिली. यामुळे विभागाचे सचिव भोसले हे जिल्ह्यात आले होते. दरम्यान जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत घेतलेल्या आढाव्यात भरडाईचे नियोजन करून त्वरित सर्व केंद्र सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
गोंदिया जिल्ह्यातील धान खरेदी संदर्भातील येणा-या अडी-अडचणी दूर करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव भोसले हे बुधवारी जिल्ह्याच्या दौ-यावर आले होते. दरम्यान त्यांनी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन, आदिवासी विकास महामंडळ, नागरी पुरवठा विभाग तसेच जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला. याप्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन, आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ.सहषराम कोरोटे यांनी जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीत धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्यात यावे, अशी मागणी लावून धरली. आढाव्यानुसार जिल्ह्यात सन २०२०-२१ च्या खरीप हंगामात ४३ लाख ९७ हजार २४७.७३ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रब्बी हंगामात ६४ हजार ९९८ हेक्टर क्षेत्रामध्ये धानाची लागवड करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार प्रति हेक्टर ४३.९३ क्विंटल उत्पादन होणार आहे. यानुरूप जवळपास २९ लाख क्विंटल धान रब्बी हंगामातून उत्पादन होणार आहे. मात्र, एवढे साठवणूक ठेवण्यासाठी गोदाम उपलब्ध नसल्याची माहिती पुढे आली. भरडाईसाठी धानाची उचल करण्यात आली नसल्याने ही अडचण निर्माण झाली आहे.
......
५६१ राईस मिलर्ससह करार नामे
खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी ५६१ करारनामे केलेल्या राईस मिलर्सपैकी ११० मिलर्स भरडाईचे काम करीत आहेत. तर उर्वरित मिलर्सकडून अद्यापही लॉटची उचल करण्यात आलेली नाही. अशी माहिती सचिवांकडे सादर करण्यात आली. यावर सचिव भोसले यांनी ज्या मिलर्संनी अद्याप धानाची उचल केली नाही. त्यांच्या अडचणी दूर करून त्यांना धान उचल करण्यासाठी प्रेरित करावे, शिवाय साठवणुकीचे पर्यायी नियोजन करून इतर सर्व धान खरेदी केंद्र सुरू करावे, असे निर्देशही दिले. सद्यस्थितीत रब्बी हंगामातील ४० धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे.