रबी हंगामासाठी धान खरेदी केंद्र सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:28 AM2021-05-14T04:28:28+5:302021-05-14T04:28:28+5:30
गोंदिया : जिल्ह्यात खरीप व रबी अशा दोन्ही हंगामात धान पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यातच खरीप हंगामातील ...
गोंदिया : जिल्ह्यात खरीप व रबी अशा दोन्ही हंगामात धान पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यातच खरीप हंगामातील धानाची उचल अद्यापही झाली नसल्याने लाखो क्विंटल धान उघड्यावर पडून आहे. तर बऱ्याच प्रमाणात धान गोदामात पडून असल्याने हंगामातील धान खरेदीची अडचण निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर फारच मोठी समस्या निर्माण झाली आहे. यावर त्वरित तोडगा काढून रबी हंगामातील धान खरेदी त्वरित सुरू करण्याची मागणी आ. परिणय फुके यांनी केली आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली. मात्र, विक्री केल्यापासून धान मिलिंगसाठी पाठविण्यात आला नाही. त्यामुळे अद्यापही धान केंद्रावरच पडून आहे. शेतकऱ्यांचे रबी हंगामातील धानाची मळणी सुरू असून रबी हंगामातील धान खरेदी केंद्र केव्हा सुरू होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच शासनाने बोनसची थकीत रक्कम त्वरित देण्याची मागणी केली आहे.