धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:38 AM2021-06-16T04:38:12+5:302021-06-16T04:38:12+5:30
मुंडीकोटा : येथे जिल्हा फेडरेशनच्या वतीने विविध सेवा सहकारी संस्था यांना जानेवारी, डिसेंबर या महिन्यापासून धान खरेदी केंद्र देण्यात ...
मुंडीकोटा : येथे जिल्हा फेडरेशनच्या वतीने विविध सेवा सहकारी संस्था यांना जानेवारी, डिसेंबर या महिन्यापासून धान खरेदी केंद्र देण्यात आले होते. त्यांनी धान खरेदी सुरू केली. परिणामी शासकीय तसेच सेवा सहकारी संस्थांचे गुदाम धानाने पूर्णपणे भरलेले आहेत. त्यामुळे रब्बी धानाची धान खरेदी करण्यास संस्थेला अडचण निर्माण झाली आहे.
शासनाने उन्हाळ्यात खरेदी केलेल्या मालाची अजून उचल केलेली नाही. या परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या पिकाची मळणी व चुरणी केली आहे. पण धान केंद्र सुरू नसल्यामुळे तो माल आपल्या घरी आणून ठेवलेला आहे. खरीप हंगाम सुरू झालेला असून, धान विकावा कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. शेतकरी फार मोठ्या संकटात सापडलेला आहे. मुंडीकोटाजवळील परिसरात नवेझरी, पांजरा, बिरसी फाटा, या गावात धान खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. पण मुंडीकोटा गाव केंद्राचे ठिकाण असून, फार मोठे गाव आहे. पावसाळा सुरू झाला असून, धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाहीत. ही फार खेदाची बाब आहे. यावेळी शेतकऱ्यांना पऱ्हे भरणे, नांगरणी करणे, बी-बियाणे आदी खर्च कुठृून करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाहीत. तीन महिने कोरोना असल्यामुळे शेतकऱ्यांना घराबाहेर पडणे कठीण झाले होते. समोर पावसाळा सुरू होत असून, शेतकऱ्यांचे शेतीचे कामे आली आहेत. त्यामुळे धान खरेदी त्वरित सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.