रब्बी धान विक्रीसाठी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:29 AM2021-04-27T04:29:40+5:302021-04-27T04:29:40+5:30
बाराभाटी : खरिपाचा धान हंगाम संपला की काही दिवसातच रब्बी धानाची लागवड केली जात आहे. आता काही दिवसातच ...
बाराभाटी : खरिपाचा धान हंगाम संपला की काही दिवसातच रब्बी धानाची लागवड केली जात आहे. आता काही दिवसातच रब्बी धान निघण्याच्या तयारीत आहे. अशावेळी शासकीय धानाची विक्री करणाऱ्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था यांनी रब्बी धान विक्रीसाठी हमीभाव खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरु करावे अशी मागणी काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती तालुकाध्यक्ष अनिलकुमार दहिवले यांनी केली आहे.
जिल्हा हा शेतीवर अवलंबून आहे. आपला जिल्हा तांदूळ नगरी असा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्यापैकी तालुका अर्जुनी मोरगाव हे धानाचे कोठारच आहे. या तालुक्यात एकूण सहा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था बाराभाटी, गोठणगाव, केशोरी, ईळदा, धाबेपवनी या आहेत. या सर्व आदिवासी सहकारी संस्थामध्ये उन्हाळी म्हणजे रब्बी धान पीक विक्रीसाठी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करणे आवश्यक आहे. अनेक गावासह भागात धानाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. धान पिकविले जाते, अनेक परिवार शेतीवरच अवलंबून आहेत. कोरोनाच्या संकटामुळे रोजगार हिरावून घेतला आहे. अशातच उन्हाळी धान पीक हाती येत आहे तर याकडे महामंडळाने कटाक्षाने लक्ष द्यावे. महामंडळाच्या दुर्लक्षित धोरणामुळे खरीप हंगामात खरेदी केलेला धान तसाच पडून आहे. त्यामुळे या धानाची त्वरित उचल करुन रब्बी हंगामातील धान खरेदी सुरु करण्याची मागणी दहिवले यांनी केली आहे.
......
शेतकरी उपाशी राहू नये, त्यांना खरिपातील धानाचा बोनस देण्यात आणि रब्बी पिकासाठी हमीभाव खरेदी केंद्र महामंडळ व संस्थानी त्वरित सुरु करावे.
- अनिल सुखदेवराव दहिवले,
तालुकाध्यक्ष, काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग