जयसेवाच्या गजरात गोंदिया जिल्ह्यात कचारगड यात्रा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:14 AM2018-01-31T11:14:25+5:302018-01-31T11:17:26+5:30
‘जयसेवा, पहाडी पाणी कुपार लिंगो, माँ काली कंकाली’ च्या गजरात लाखो आदिवासी समाजबांधवाचे श्रध्दास्थान असलेल्या कचारगड येथील यात्रेला मंगळवारपासून (दि.३०) सुरूवात झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: ‘जयसेवा, पहाडी पाणी कुपार लिंगो, माँ काली कंकाली’ च्या गजरात लाखो आदिवासी समाजबांधवाचे श्रध्दास्थान असलेल्या कचारगड येथील यात्रेला मंगळवारपासून (दि.३०) सुरूवात झाली. पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेत विविध राज्यातील लाखो समाजबांधव सहभागी होतात.
मध्य भारतातील ही सर्वात मोठी यात्रा आहे. यानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील आदिवासी समाजासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शासकीय मदत तसेच येथील पारी कोपार लिंगो मां काली कंकाली देवस्थानच्यावतीने धनेगाव येथे राष्ट्रीय गोंडवाना महासंमेलन आणि महागोंगो ना कोय पुनेम पुनर दिक्षा सम्मेलन व गोंडी संस्कृतीशी निगडीत अनेक कार्यक्रम सादर केले जातात.आशिया खंडातील सर्वात मोठ्या नैसर्गिक गुफेत जाऊन आशियासह इतर गैर आदिवासी सुद्धा येथे हजेरी लावतात. त्या रहस्यमयी गुफेबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता येथे आल्यावर शिगेला पोहोचते.
गोंडी धर्माच्या मान्यतेनुसार गुफेत गोंडी संस्कृतीचे रचनाकार शंभु-गौरा, पहाडी पाणी कुपार लिंगो, माँ काली कंकाली, रायताड जंगो, संगीत सम्राट दिशासुका पाटालिर, ३३ कोट सगापेन आणि १२ पेन अंतर्गत ७५० गणनेत सल्ला-गांगरा शक्ती यांच्या कर्म भूमिचे व धर्म संस्कृतीचे दर्शन घडते. हे स्थळ आदिवासी समाजाचे उगम स्थान मानले जाते. म्हणून वर्षातून एकदा आद्य पौर्णिमेला देशातील १८ ते २० राज्यातील आदिवासी भाविक मोठ्या संख्येने येथे दाखल होतात.
महाराष्ट, मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातीलच नव्हे तर उत्तराखंड, बिहार, ओडीसा, आंधप्रदेश, उत्तरप्रदेश, बंगाल आदी प्रांतातून येतात. भाविकांची संख्या पाहता जिल्हा व तालुका प्रशासन आणि आयोजन समितीसह स्थानिक आमदार, खासदार व इतर लोकप्रतिनिधी सुद्धा महिनाभर आधीपासून यात्रेच्या तयारीला लागतात. आधीपासून कामाला लागतात.
पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त
कचारगड परिसर डोंगराळ आणि घनदाट जंगल व्याप्त असून अतिदुर्गम व संवेदनशील नक्षलग्रस्त भागात आहे. येथे भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तसेच वेळेवर मदत पोहोचविण्यासाठी शेकडो पोलिसांचा बंदोबस्त असतो. यात्रेच्या ठिकाणी धनेगावपासून तर वर गुफेपर्यंत प्रत्येक ठिकाणी पोलिसांच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ आणि सालेकसाचे ठाणेदार मोहन खंदारे लक्ष ठेवून आहेत.
कचारगड यात्रेदरम्यान एकीकडे लाखोंच्या सख्येंने आदिवासी समाजबांधव सहभागी होतात. तसेच इतर समाजातील पर्यटक व हौशी लोक यात्रेत सहभागी होतात. प्रत्येकाला योग्य सोयी सुविधा मिळावी म्हणून कचारगड देवस्थान समिती पुरेपूर प्रयत्न करते. यासाठी प्रत्येकांनी सहकार्य करावे.
- दुर्गाप्रसाद कोकोड, अध्यक्ष कचारगड देवस्थान समिती.