मेडिकलमधील ऑक्सिजन जनरेशन प्लांट त्वरित सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:27 AM2021-04-13T04:27:54+5:302021-04-13T04:27:54+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊन रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी ...
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊन रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अदानी वीज प्रकल्पाच्या सीएसआर निधीतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल) मंजूर करण्यात आलेले ऑक्सिजन जनरेशन प्लांट त्वरित सुरू करा, जिल्ह्यातील रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश खा. प्रफुल्ल पटेल यांनी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांना दिले.
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून रुग्ण संख्येत दररोज भर पडत आहे, तर ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. याचीच दखल घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी जिल्हाधिकारी मीना यांच्याशी चर्चा केली. आ. मनोहर चंद्रिकापुरे व माजी आ. राजेंद्र जैन यांनासुद्धा या विषयावर चर्चा करून जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा कशा उपलब्ध होतील या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांसह चर्चा करण्यास सांगितले होते. यानंतर चंद्रिकापुरे व जैन यांनी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांची भेट घेऊन त्यांच्याशी आरोग्यविषयक सोयीसुविधांबाबत चर्चा केली. कोरोनाच्या गंभीर रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणीत एकाच वेळी वाढ झाल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याचा काळाबाजार सुरू असून अतिरिक्त दराने त्याची विक्री केली जात असल्याने सर्वसामान्य आणि गोरगरीब रुग्णांना त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवण्यास सांगितले. तसेच अदानी वीज प्रकल्पाच्या सीएसआर निधीतून मेडिकलमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट मंजूर करण्यात आला आहे. तो त्वरित सुरू केल्यास ऑक्सिजन तुटवड्याची समस्या निर्माण होणार नाही. त्यासाठी युद्धपातळीवर काम करण्यास सांगितले. तसेच सनफ्लकमधून ऑक्सिजन पुरवठा करण्याची मागणी केली. खा. पटेल यांनी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. आरोग्य व्यवस्थेसह काेविड नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याकरिता आपले सदैव सहकार्य राहील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. यावेळी आ. मनोहर चंद्रिकापुरे आणि माजी आ. राजेंद्र जैन यांनीसुद्धा जिल्ह्यातील कोविड परिस्थिती आरोग्यविषयक सोयी सुविधांचा आढावा घेत रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यास जिल्हा प्रशासनाला सांगितले.
........
दोन्ही जिल्ह्यांत परिस्थितीवर माझे लक्ष
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत कोविड रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. मी जरी बाहेर असलो तरी या दोन्ही जिल्ह्यांतील सर्व परिस्थितीवर बारीक नजर ठेवून असून दररोज जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याचा आढावा घेऊन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तसेच रुग्णांना आरोग्यविषयक सोयी सुविधा वेळेत मिळतील याची काळजी घेण्याचे निर्देशसुद्धा मी प्रशासनाला दिले असल्याचे खा. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.