मेडिकलमधील ऑक्सिजन जनरेशन प्लांट त्वरित सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:28 AM2021-04-13T04:28:05+5:302021-04-13T04:28:05+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊन रुग्णांची गैरसोय होऊ नये ...
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊन रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा नियोजन समिती आणि अदानी वीज प्रकल्पाच्या सीएसआर निधीतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल) मंजूर करण्यात आलेले ऑक्सिजन जनरेशन प्लांट त्वरित सुरू करण्यात यावे यासंदर्भात अदानी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. रुग्णांची गैरसोय होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांच्याशी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी चर्चा साेमवारी केली.
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून, रुग्णसंख्येत दररोज भर पडत आहे. तर ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. याचीच दखल घेत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी जिल्हाधिकारी मीना यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. तसेच माजी आ. राजेंद्र जैन आणि मनोहर चंद्रिकापुरे यांनी सुद्धा खासदार पटेल यांच्या निर्देशावरून सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. जिल्हा नियोजन समिती व अदानी वीज प्रकल्पाच्या सीएसआर निधीतून मंजूर मेडिकलमधील ऑक्सिजन जनरेशन प्लांट त्वरित सुरू करण्यासंदर्भात अदानी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा खासदार पटेल यांनी चर्चा केली. जिल्ह्यात कोरोनाच्या गंभीर रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणीत एकाचवेळी वाढ झाल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याचा काळाबाजार सुरू अतिरिक्त दराने त्याची विक्री केली जात असल्याने सर्वसामान्य आणि गोरगरीब रुग्णांना त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवण्यास सांगितले. मेडिकलमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट मंजूर करण्यात आले आहे. ते त्वरित सुरू केल्यास ऑक्सिजन तुटवड्याची समस्या निर्माण होणार नाही. त्यासाठी युद्धपातळीवर काम करण्यास सांगितले. तसेच
सनफ्लेगमधून ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांसोबत खासदार पटेल यांनी चर्चा केली.
जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. आरोग्य व्यवस्थेसह काेविड नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याकरिता आपले सदैव सहकार्य राहील अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे आणि माजी आ. राजेंद्र जैन यांनी सुध्दा जिल्ह्यातील कोविड परिस्थिती आरोग्य विषयक सोयी-सुविधांचा आढावा घेत रुग्णांची गैरसोय होणार याची काळजी घेण्यास जिल्हा प्रशासनाला सांगितले.
........
दोन्ही जिल्ह्यातील परिस्थितीवर माझे लक्ष
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. मी जरी बाहेर असलो तरी या दोन्ही जिल्ह्यातील सर्व परिस्थितीवर बारीक नजर ठेवून असून, दररोज जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याचा आढावा घेऊन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तसेच रुग्णांना आरोग्य विषयक सोयी-सुविधा वेळेत मिळतील याची काळजी घेण्याचे निर्देश सुद्धा मी प्रशासनाला दिले असल्याचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.