वाढती रुग्णसंख्या विचारात घेता ऑक्सिजन प्लांट त्वरित सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:28 AM2021-04-15T04:28:25+5:302021-04-15T04:28:25+5:30
गोंदिया : जिल्ह्यात दररोज सहाशे कोरोना बाधित रुग्णांची भर पडत आहे. यात गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. शासकीय रुग्णालय ...
गोंदिया : जिल्ह्यात दररोज सहाशे कोरोना बाधित रुग्णांची भर पडत आहे. यात गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. शासकीय रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरची क्षमतादेखील आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होत आहे. रुग्णसंख्येची वाढ कायम असल्याने जिल्ह्यात अजून बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मेडिकलमधील मंजूर ऑक्सिजन जनरेशन प्लांट त्वरित सुरू करून रुग्णांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.
जिल्ह्यात मागील वर्षी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजन प्लांट शासनाने मंजूर केले होते. यासाठी ५० लाख रुपयांचा निधीसुध्दा मंजूर केला होता. मात्र अद्यापही हा प्लांट सुरू करण्यात आला नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. सहा महिन्याचा कालावधी लोटूनही आणि संदर्भात वेळाेवेळी पाठपुरावा करूनसुद्धा हा प्लांट सुरू करण्यास दिरंगाई केली जात आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून आरोग्य विभागाने याची अद्यापही गांभीर्याने दखल घेतली नाही. यामुळे जिल्ह्यात बिकट परिस्थिती निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण राहणार, असा सवाल देखील माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी उपस्थित केला आहे. जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दररोज गंभीर होत चालली आहे. दररोज ६०० ते ७०० रुग्णांची भर पडत असल्याने आता रुग्णातील बेडदेखील अपुरे पडत आहे. औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र यानंतरही जिल्हा व आरोग्य प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही. हा सर्व प्रकारच धक्कादायक असून यामुळे जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबींवर माजी आ. अग्रवाल यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावर देशमुख यांनी सर्व समस्या मार्गी लावण्याचे व ७ दिवसात ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याचे आश्वासन अग्रवाल यांना दिले.
........
-तर ५० ते ६० जणांचे प्राण वाचविणे झाले असते शक्य
मागील वर्षी शासनाने मेडिकलमध्ये मंजूर केलेला ऑक्सिजन प्लांट वेळेत सुरू झाला असता तर जिल्ह्यातील ५० ते ६० रुग्णांचे जीव वाचविणे शक्य झाले असते. ऑक्सिजनसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची वेळी आली नसती. तसेच शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला नसता. मात्र प्रशासनाच्या दप्तरदिरंगाईचे परिणाम आता रुग्णांना भोगावे लागत असल्याचा आरोप माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी केला आहे.
......
..कोट ...
जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची कल्पना असताना आणि ऑक्सिजन प्लांटसाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर असतानासुध्दा तो सुरू करण्याकडे यंत्रणेने पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठाेर कारवाई करून रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ऑक्सिजन प्लांट त्वरित सुरू करण्याची गरज आहे.
- गोपालदास अग्रवाल, माजी आमदार