नोकरभरती प्रक्रिया सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:18 AM2021-07-05T04:18:24+5:302021-07-05T04:18:24+5:30
अर्जुनी मोरगाव : राज्य लोकसेवा आयोग व इतर विभागाच्या आतापर्यंत रखडलेल्या नियुक्त्या, पदभरती त्वरित करा. ओबीसी संघर्ष कृती समितीद्वारे ...
अर्जुनी मोरगाव : राज्य लोकसेवा आयोग व इतर विभागाच्या आतापर्यंत रखडलेल्या नियुक्त्या, पदभरती त्वरित करा. ओबीसी संघर्ष कृती समितीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव मराठा आरक्षण, तसेच इतर कारणांमुळे पद भरती रखडली आहे. विद्यार्थ्यांचे वय वाढत आहे. मागील सरकारने महापोर्टलमार्फत भरती केली त्यात अनेक घोटाळे झाले. हे पोर्टल बंद करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेऊन यात वर्ग ३ व ४ ची पदेसुद्धा भरावीत. एमपीएससी आयोगाची सदस्य संख्या ६ असायला पाहिजे. ती मागील ३ वर्षांपासून दोनच आहे. त्यात नवीन सदस्य भरावेत. कंत्राटी पद्धत रद्द करून पूर्णवेळ नोकरी द्यावी, पोलीस भरती करण्यात यावी, कारोनामुळे नोकरीच्या वयोमर्यादेत वाढ करावी, महा-आयटी या सरकारी कंपनीची एसआयटीमार्फत चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी; अन्यथा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ओबीसी कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार, आ. मनोहर चंद्रिकापुरे, सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांना दिले आहे. यावेळी आ. मनोहर चंद्रिकापुरे, तहसीलदार विनोद मेश्राम, ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हा उपाध्यक्ष व कृ.उ.बा. समितीचे प्रशासक उद्धव मेहेंदळे, राष्ट्रवादी काँगेसचे तालुकाध्यक्ष व कृ.उ.बा. समितीचे मुख्य प्रशासक लोकपाल गहाणे, बाळू हुकरे, कैलास कासार व इतर उपस्थित होते.