नगरपंचायत क्षेत्रात ‘रोहयो’ची कामे सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:29 AM2021-09-19T04:29:37+5:302021-09-19T04:29:37+5:30
सडक-अर्जुनी : ‘रोहयो’ची कामे नगर परिषद क्षेत्रात घेण्याबाबत शासनाचे धोरण असून व नागरिकांनी मागणी करूनही रोहयोची कामे सुरू न ...
सडक-अर्जुनी : ‘रोहयो’ची कामे नगर परिषद क्षेत्रात घेण्याबाबत शासनाचे धोरण असून व नागरिकांनी मागणी करूनही रोहयोची कामे सुरू न केल्यास बेरोजगार भत्ता घ्यावा लागेल. सबब, कामाचे नियोजन करून शासनाची मान्यता व निधी प्राप्त करून कामे सुरू करा, अशा सूचना आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी दिल्या.
सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव नगर पंचायतीमधील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी (दि. १७) आयोजित आढावा बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. याप्रसंगी त्यांनी ज्या लाभार्थ्यांकडे आवास बांधकामासाठी स्वतःच्या नावे जमीन नसून, आबादी जागेवर सध्या घर आहे. तसेच अतिक्रमित जागेवर घर आहे, त्यांच्या घराची जागा नियमानुकूल करून देण्यासाठी आवश्यक बाबीची त्वरित पूर्तता करण्यात येईल, असे प्रशासनाकडून आश्वासित केले. नवीन घरकुलांची कामे त्वरित पूर्ण करण्यासाठी निधी नियमित वाटप करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. नगर परिषदेचा डीपीआर त्वरित मंजूर करून घेणे, नगरात पायाभूत सुविधांची नवीन कामे प्रस्तावित करणे, पिण्याच्या पाण्यासाठी सविस्तर योजना तयार करणे, पावसामुळे नगरातील रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी भराव भरणे, कोविड-१९ बाबत नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी फलक लावून जनजागृती करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. बैठकीला जिल्हाधिकारी नयना गुंडे, उपविभागीय अधिकारी विनोद मेश्राम, जिल्हा प्रशासनाधिकारी करण चव्हाण, उपजिल्हाधिकारी रोहयो गोसावी, तहसीलदार उषा चौधरी, मुख्याधिकारी पाटणकर, मुख्याधिकारी शिल्पाराणी जाधव, भूमी अभिलेख अधिकारी मेश्राम, अभियंता जाधव व नगरपंचायतीचे अन्य अधिकारी उपस्थित होते.