तेलीटोला-मक्काटोला रस्त्याचे काम सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 10:28 PM2018-08-25T22:28:09+5:302018-08-25T22:28:46+5:30
सालेकसा तालुक्यातील तेलीटोला-कडौतीटोला-मक्काटोला-वारकरीटोला या रस्त्याच्या बांधकामाला मंजुरी मिळाली. १९ जून २०१८ ला क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते सदर रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील तेलीटोला-कडौतीटोला-मक्काटोला-वारकरीटोला या रस्त्याच्या बांधकामाला मंजुरी मिळाली. १९ जून २०१८ ला क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते सदर रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र दोन महिन्याचा कालावधीे लोटून अद्यापही कामाला सुरूवात झाली नाहीे. त्यामुळे या मार्गावरुन ये-जा करताना गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता बांधकामाचे भूमिपूजन झाले मात्र बांधकाम केव्हा सुरू करणार असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
तेलीटोला-मक्काटोला मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच कडौतीटोला ते मक्काटोला या मार्गावर खड्याबरोबरच रस्त्यावर पाणी साचून राहते. मक्काटोला येथे पुजारीटोला धरण आहे. अनेकवेळा धरण भरल्यानंतर रविवारला अनेक लोक धरणाला भेट देतात. शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी सदर मार्गाने ये-जा करतात. मात्र हा रस्ता पूर्णपणे खराब झाला असल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. गावकऱ्यांनी या रस्त्याच्या समस्येकडे लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर याची दखल घेत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत या रस्ता बांधकामाला मंजुरी दिली. दोन महिन्यापूर्वीच या रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आ.पुराम यांच्या हस्ते करण्यात आले.
रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी गिट्टी सुध्दा टाकण्यात आली. मात्र अद्यापही कामाला प्रत्यक्षात सुरूवात करण्यात आली नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून चिखल तयार झाले आहे. त्यामुळे या मार्गावरुन ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे गावकरी व विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेत रस्त्याचे काम लवकर सुरू करण्याची मागणी गावकºयांनी केली आहे. अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.