पाणी पुरवठा सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 10:41 PM2018-05-27T22:41:06+5:302018-05-27T22:41:06+5:30
ग्राम बोळदे येथे १० दिवसांपासून नळ बंद आहेत. खांबी-पिंपळगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेद्वारे या गावाला नळ योजनेव्दारा पाणी पुरवठा केला जात होता. परंतु नळ योजना बंद झाल्यामुळे या गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बाराभाटी : ग्राम बोळदे येथे १० दिवसांपासून नळ बंद आहेत. खांबी-पिंपळगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेद्वारे या गावाला नळ योजनेव्दारा पाणी पुरवठा केला जात होता. परंतु नळ योजना बंद झाल्यामुळे या गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नळ योजना पूर्ववत सुरू करुन पाणी पुरवठा करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
अर्जुनी-मोरगाव पंचायत समिती अंतर्गत येणारे हे गाव आहे. ही गट ग्रामपंचायत बोळदे-सुकडी अशी आहे. बोळदे गावात पिण्याच्या पाण्याची अनेक वेळा समस्या निर्माण होते. त्यात मागील आठ दहा दिवसांपासून गावात पाण्याची भिषण टंचाई आहे. १३ मे पासून नळाचे पाणी बंद झाले आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे बोअरवेलवर अनेकवेळा महिलांची भांडणे होत असल्याचे चित्र आहे. एक घागर भरायला तास-दोन तास वेळ वाया घालावा लागतो. घरी नळ असून ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. नळाचे पाणी बंद करण्यापूर्वी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोणतीच सूचना दिली नव्हती. या गावात नळाचे बिल थकीत आहे. योजना पुर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे.
नळ कनेक्शन धारकांवर बिल थकीत आहे. पाणी वापरणारे वेळेवर पैसे भरत नसल्यामुळे पाणी पुरवठा करण्यात अडचण येते. बिलाचा भरणा केल्यास पाणी पुरवठा पूर्ववत करता येईल.
-किशोर तरोणे, अध्यक्ष, खांबी पिंपळगाव पाणी पुरवठा समिती